‘एक्स्प्रेस-वे’च्या टोलमध्ये तीन महिन्यांत २० कोटींची वाढ
By admin | Published: July 18, 2016 04:38 AM2016-07-18T04:38:02+5:302016-07-18T04:38:02+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे.
विवेक भुसे,
पुणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावणाऱ्या वाहनांच्या संख्येत एका वर्षात तब्बल दुपटीने वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे केवळ तीन महिन्यांत मागील वर्षीच्या तुलनेत २० कोटी रुपयांनी टोल वसुलीत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
विशेष म्हणजे टोल कंपनी वाहनांची संख्येत फेरफार करते, असे आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केल्यानंतर आणि टोलचा पाठपुरावा केल्यानंतर आलेली नवी आकडेवारी काहीशी समाधानकारक आहे.
आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये १३ लाख वाहने वाढली होती़ मात्र, २०१५ च्या तुलनेत २०१६ मध्ये तब्बल ६१ लाख वाहने वाढली असल्याचे दिसून येत आहे़ तसेच एप्रिल ते जूनमध्ये १३३ कोटी ७९ लाख ५२ हजार ४१३ रुपये टोल वसुली झाली. मागीलवर्षी याच काळात ११३ कोटी १६ लाख २० हजार २४४ रुपयांचा टोल वसूल झाला होता़
२०१५ ते २०१६ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीची माहिती आयआरबी कंपनीने सादर केली असून त्यात आजवरची सर्वाधिक वाहनसंख्या आणि टोल वसुलीतील वाढ दिसून आली आहे़ एक्स्प्रेस वे तसेच इतर महामार्गावर धावणाऱ्या वाहनांची संख्या कमी दाखविली जाते. परिणामी टोलची रक्कमही कमी दाखविली जात असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला होता. पुणे -कोल्हापूर मार्गावरील किणी टोलनाक्यावर दोन वेगवेगळ्या संस्थांनी केलेली पाहणी आणि टोल कंपनीने दाखविलेल्या वाहनांच्या संख्येत मोठा फरक आढळला होता.
आता तर टोल बंद करा!
टोलवसुली करणाऱ्या कंपनीनेच उपरोक्त आकडेवारी दिली असल्याने ती खरी असणाऱ टोलमुक्तीचे आश्वासन देणारे आता काय निर्णय घेणार हे महत्त्वाचे आहे़ माहिती अधिकार कायद्याच्या बडग्यामुळे ही माहिती गेल्या वर्षी पुढे आली, तेव्हापासूनच टोल बंद झाला पाहिजे, अशी आमची मागणी आहे़
- विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
राज्य शासनाने माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांना अभ्यास करुन अहवाल देण्यास सांगितले होते़ त्यांनी शासनाला अहवाल दिला असून टोलमुक्तीसाठी काय करता येईल, याचा कृती अहवाल शासन तयार करीत आहे़