एक्स्प्रेस वेवर वाय-फाय
By Admin | Published: January 7, 2017 05:35 AM2017-01-07T05:35:30+5:302017-01-07T05:35:30+5:30
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर लवकरच वायफायची सुविधा मिळणार
नारायण जाधव,
ठाणे- मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेसह ठाण्याच्या घोडबंदर रस्त्यावर लवकरच वायफायची सुविधा मिळणार असून त्यासाठी टेलिकॉम आॅपरेटर्सकडून निविदा मागवल्या आहेत. वायफाय नेटवर्कमुळे एमएसआरडीसीसह राज्य महामार्ग पोलिसांनाही सीसीटीव्हीच्या माध्यमातून टोल बूथवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेसह घोडबंदर रोडवर कोणत्या भागांमध्ये वायफाय झोन तयार केला जाऊ शकतो, याची तपासणी सुरू आहे. तसेच भविष्यात एफएमसेवेच्या माध्यमातूनही प्रवाशांना वाहतूककोंडीची अथवा एखादा अपघात घडल्यास त्याची माहिती दिली जाणार आहे. यासाठी नेमके किती वायफाय झोन- हॉटस्पॉट सुरू करायचे, तसेच शुल्क आकारणी करायची का, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसला तरी या तिन्ही कामांसाठी रस्ते विकास महामंडळाने संबंधितांकडून निविदांद्वारे देकार मागवले आहेत.
मुंबई-पुणे रस्त्यावरील प्रवास जलद व्हावा, म्हणून सुमारे ३३३१ कोटी रुपये खर्चून खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान १.७५ आणि ८.९४ किमी लांबीचे प्रत्येकी चार लेनचे दोन बोगदे, १२ किमीचा बायपास रस्ता आणि खालापूर फूड मॉल ते खोपोलीदरम्यान आठपदरी एलिव्हेटेड रस्ता बांधण्यात येणार आहे. शिवाय, मानखुर्द ते वाशी खाडीदरम्यान ५९० कोटी रुपये खर्चून तिसरा सहापदरी खाडी पूल बांधण्यात येणार आहे. या कामांमुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांचा सुमारे अर्धा ते पाऊण तासाचा वेळ वाचणार आहे.
>एक बोगदा डोंगरातून, दुसरा तलावाखालून
सुसाट वाहतुकीसाठी जे बोगदे बांधण्यात येणार आहेत, त्यातील एक डोंगरातून, दुसरा लोणावळा लेकखालून नेण्यात येणार असल्याचे समजते.मोबाइल नेटवर्कवरही भर
वायफायव्यतिरिक्त मोबाइल नेटवर्कसुविधाही मजबूत करण्यावर एमएसआरडीसी भर देत आहे. संजय गांधी उद्यानामुळे घोडबंदर रोड आणि खंडाळा घाटातील डोंगराच्या रांगांमुळे एक्स्प्रेस-वेवर अनेक ठिकाणी मोबाइल नेटवर्क मिळत नाही. त्या ठिकाणी टेलिकॉम आॅपरेटर्सनी बेस ट्रान्सिव्हर सर्व्हिस बसवावेत, असा एमएसआरडीसीचा आग्रह आहे.
वाशी खाडीपुलाचा होणार विस्तार : जुना खाडीपूल कमकुवत झाल्याने १९९७ साली तीनपदरी दोन पूल बांधण्यात आले. मात्र, गेल्या वर्षांपासून सायन-पनवेल मार्गाचे रुंदीकरण होऊन तो सायन ते कळंबोली असा दहापदरी झाला आहे. यामुळे सध्या वाशीखाडी ते टोलनाक्यापर्यंत वाहतूककोंडी होते. त्यावर उपाय म्हणून १.८४ किमी लांबीचा हा नवा खाडीपूल बांधण्यात येणार आहे. यात तीनतीन पदरांचे दोन पूल बांधण्यात येणार आहेत. तर, १.३९ किमी लांबीचा नवीन अॅप्रोच रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांचा १० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
>एकूण १४ लेन
सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर सहा लेन आहेत. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर चार अशा १० लेन आहेत. बायपासमुळे आणखी चार लेनची भर पडणार असून यामुळे हा महामार्ग १४ लेनचा होणार आहे.