शिवसेनेतून रामदास कदम, आनंदराव अडसूळ यांची हकालपट्टी; खरमरीत पत्रानंतर ठाकरेंची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:17 PM2022-07-18T16:17:57+5:302022-07-18T16:21:18+5:30
बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नेते पदी निवड केली. परंतू त्यांच्या पश्चात नेतेपदाला काही अर्थ राहिला नाही, असा आरोप रामदास कदमांनी नेतृत्वावर केला होता.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीका करून रामदास कदम यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला होता. आता शिवसेनेने रामदास कदमांसह आनंदराव अडसूळांची पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी माझी नेते पदी निवड केली. परंतू त्यांच्या पश्चात नेतेपदाला काही अर्थ राहिला नाही. माझ्यावर आरोप केले गेले, परंतू मला माझी बाजू मांडण्यासाठी मीडियासमोर येण्यास मज्जाव करण्यात आला होता, असा आरोप रामदास कदमांनी पत्रातून केला होता. रामदास कदम हे गेल्या काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच त्यांचा विधानपरिषद आमदारकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी मिळाली नव्हती. तेव्हापासून ते शिवसेना सोडणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, आपण अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आज त्यांनी शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिल्याने आता त्यांची पुढची वाटचाल काय असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
यानंतर 'रामदास कदम यांच्या शुभेच्छा आमच्यासोबत होत्या, त्यांचे पुत्र आमदार योगेश कदम हे आमच्यासोबतच आहेत. आता, मी रामदास कदम यांच्याशी बोलेन अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
रामदास कदम यांनी राजीनामा मातोश्रीवर पाठवला. या राजीनामा पत्रात म्हटलंय की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहिली नाही हे मला पाहायला मिळालं. आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून शिवसेना नेत्यांना विश्वासात घेण्याचं काम आपल्याकडून कधीच झालं नाही. उलटपक्षी मला आणि माझा मुलगा आमदार योगेश कदम याला अनेक वेळा अपमानित करण्यात आले अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तसेच विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपण मला अचानक मातोश्रीत बोलावून घेतले आणि मला आदेश दिलेत की, यापुढे तुमच्यावरती कुणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले, मातोश्रीवर कुणी काही बोलले तरी आपण मीडियासमोर अजिबात जायचे नाही. मीडियासमोर कुठलेही वक्तव्य करायचे नाही. यामागचं कारण मला आजपर्यंत कळू शकले नाही. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करत आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे व महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक याचा साक्षीदार आहे असंही रामदास कदम म्हणाले.