पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 07:50 AM2022-07-16T07:50:35+5:302022-07-16T07:51:14+5:30

एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरूच आहे.

Expulsion of senior leader Vijay Shivtare of Shiv Sena in Pune district; Uddhav Thackeray's orders | पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंचे आदेश

पुणे जिल्ह्यातील शिवसेनेच्या बड्या नेत्याची हकालपट्टी; उद्धव ठाकरेंचे आदेश

googlenewsNext

मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेत फूट पडल्याचं दिसून येत आहे. आम्हीच शिवसेना आहोत असा दावा शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला शिवसेनेच्या ५५ पैकी ४० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे पक्षातच उद्धव ठाकरेविरुद्ध एकनाथ शिंदे असा गट पडला. त्यात केवळ आमदारच नाही तर माजी मंत्री, जिल्हाप्रमुख, नगरसेवक, खासदारही शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. 

एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी करण्याचं सत्र सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातील शिवसेनेचे मोठे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत शिवतारे यांचे शिवसेना सदस्यत्वदेखील रद्द केल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली आहे. याआधीच शिवसेनेचे पुण्यातील नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात शिवसेनेला जबर फटका बसताना दिसत आहे. 

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शिरुर येथील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचीही पक्षाने हकालपट्टी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट त्यांनी सोशल मीडियात शेअर केली होती. त्यानंतर सामना दैनिकातून त्यांच्या हकालपट्टीची बातमी छापण्यात आली. मात्र अनावधानाने आढळराव पाटील यांची बातमी प्रसिद्ध झाली असं सांगत उद्धव ठाकरे यांनी ते शिवसेनेतच आहेत असं म्हटलं. मात्र शिवाजीराव आढळराव यांनी हकालपट्टीच्या बातमीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. 

शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये
ठाण्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या त्यामुळे त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचं सांगत जिल्हाप्रमुखपदी म्हस्के यांच्या पुनर्नियुक्तीची घोषणा केली. त्यानंतर शिवसेनेने हे वृत्त निराधार असून म्हस्के यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही. शिवसैनिकांनी भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन करत पक्षप्रमुखांच्या आदेशाशिवाय शिवसेनेत कुणीही कुणाची नियुक्ती करू शकत नाही असं खडसावलं आहे. 

Web Title: Expulsion of senior leader Vijay Shivtare of Shiv Sena in Pune district; Uddhav Thackeray's orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.