प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढवा; भाजपाच्या मंत्र्यांचे केंद्राला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 10:19 PM2023-07-24T22:19:44+5:302023-07-24T22:20:50+5:30
केंद्राने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर तातडीने निर्णय घेण्याचीही केली विनंती
Crop Insurance, Farmer: चंद्रपूरसह राज्यात अनेक भागात झालेल्या आणि अजूनही काही भागात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनास पत्र लिहून केली.
अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून इंटरनेट सेवांसह अन्य दळण वळण सुविधाही खंडित झाल्या असल्याने पंतप्रधान कृषी विमा योजनेच्या नोंदणीची मुदत वाढविण्याची आवश्यकता आहे. pic.twitter.com/YcyNLiFnMZ
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) July 24, 2023
चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. इंटरनेट, दूरध्वनी सेवा, विज पुरवठाही अतिवृष्टी आणि पुरामुळे खंडित झाले आहेत. अशा परिस्थितीत सध्याच्या विहित मुदतीत शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी करता येणे शक्य होणार नाही. केवळ चंद्रपुरातच नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे अशीच परिस्थिती निर्माण झाली असल्याने, केंद्र शासनाने प्रधानमंत्री कृषी विमा योजनेची नोंदणी मुदत वाढविण्याची आवश्यकता आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय कृषी खात्यास लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
शेतकरी मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री कृषी विमा योजनेच्या सुरक्षाकवचावर अवलंबून असतो. या योजनेची व्यापकता आणि लेकप्रियता लक्षात घेता केंद्राने राज्यातील नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर योग्य तो निर्णय तातडीने घेण्याची विनंती सुधीर मुनगंटीवार यांनी या पत्राद्वारे केली आहे.