सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 07:57 AM2023-11-09T07:57:43+5:302023-11-09T07:57:58+5:30
प्रत्येक जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबविणार
मुंबई : शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, तसेच प्रत्येक पालकमंत्र्यांनी समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांत ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ प्राधान्याने राबवावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांना बुधवारी केले.
मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो ११ कलमी कार्यक्रमा’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ हा सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम असून मुंबई उपनगरमध्ये हा उपक्रम सुरू झाला त्याच धर्तीवर राज्यातही प्रभावीपणे राबविण्याचे त्यांनी सांगितले.
शासन कटिबद्ध
दिवाळी जवळ आली असताना ‘नमो ११ कलमी कार्यक्रमा’चा शुभारंभ होत आहे. शासनाच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक घटकाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत.
आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तर महापालिका व मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या सहकार्यातून ‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ यशस्वीपणे राबविणार आहोत, असे मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
सर्व घटकांना लाभ : फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जगातील पाचव्या स्थानावर नेले आहे. त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करीत आहोत. कामगार, महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चित मदत करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.