नितीन गडकरी- फडणवीस यांची ‘विस्तारित’ चर्चा
By admin | Published: November 30, 2015 03:16 AM2015-11-30T03:16:21+5:302015-11-30T03:16:21+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर विचारमंथन झाले
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी रात्री वाड्यावर जात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली. या चर्चेत मंत्रिमंडळ विस्तारावर विचारमंथन झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना सामावून घेत महत्त्वाची खाती द्यायची, मराठवाडा व मुंबईला झुकते माप द्यायचे व सोबत विदर्भालाच खूपकाही दिले जात आहे, असा संदेश जाणार नाही याची काळजी घ्यायची या मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील आहेत. याशिवाय ऊर्जा व वित्त, वन यासारखी महत्त्वाची खातीही विदर्भाला मिळाली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात विदर्भाला पुन्हा झुकते माप न देता एखाद-दुसऱ्या आमदाराला संधी देऊन इतरांना मंडळ, महामंडळांवर सामावून घेता येईल, यावर गडकरी-फडणवीस यांच्यात एकमत झाल्याचे समजते. शिवाय, मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून कोणाला मंत्रिमंडळात स्थान द्यायचे यावर चर्चा झाली. या चर्चेत भाजपाचे मुंबई शहर अध्यक्ष आ. आशिष शेलार यांचे नाव होते.
मित्रपक्षांना डावलले जात आहे. त्यांची फरफट होत आहे, असे आरोप राजकीय वर्तुळात केले जात आहेत. त्यामुळे मित्रपक्षांतून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत तसेच खा. रामदास आठवले यांच्या गटातून एकाला संधी देण्यावर उभयतांमध्ये एकमत झाल्याचे समजते. (प्रतिनिधी)