मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा मोजमाप करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 06:22 PM2023-08-15T18:22:15+5:302023-08-15T18:22:54+5:30

कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलेलं नाही असंही शिंदे म्हणाले.

Extends a helping hand, but does not measure - Chief Minister Eknath Shinde | मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा मोजमाप करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मदतीचा हात पुढे करतो, तेव्हा मोजमाप करत नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

googlenewsNext

मुंबई - राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी आजपासून होतेय. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटीचा आकडा कधी पोहोचला हे समजले सुद्धा नाही. मदतीचा हात जेव्हा मी पुढे करतो तेव्हा मी यामध्ये मोजमाप करत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा माझा जिव्हाळ्याचा विषय असून काही गोष्टी निकषात बसत नाही मात्र वैद्यकीय मदतीचा विषय असल्याने त्यात मार्ग काढला जातो. आमचं सरकार आल्यापासून मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीपासून शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, यापैकी कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशा प्रकारची काळजी घेण्याचे काम या सरकारने केले आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्याला जो काही अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे.  एक सही एखाद्याला उपचार देत असेल त्याचा जीव वाचत असेल तर मला अशा कितीही सह्या केल्या तरी कमीच वाटतात. अधिकारांचा वापर सर्वसामान्यांसाठी करतो. सामान्यांसाठी केलेल्या सह्या कमीच वाटतात.  कोरोना काळात आपली माणसं परकी झाली होती. या परिस्थितीमध्ये कोरोना काळात एक टीम म्हणून काम केलं. कुठल्याही संकट समयी मदत करताना मोजमाप केलेलं नाही असंही शिंदे म्हणाले.

मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एक वर्ष एक महिन्यात १२ हजार ५०० रुग्णांना लाभ देण्यात आला.  यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

रखडलेले प्रकल्प पुढे नेणार

महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी ही योजना लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.रखडलेले प्रकल्प देखील पुढे नेण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत. राज्यात गोरगरीब लोकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू केली याचा लाभ मोठ्या प्रमाणात रुग्णांना होत आहे. महाराष्ट्र आज विदेशी थेट गुंतवणुकीत देशात प्रथम क्रमांकावर आले असून त्यामुळे राज्यात रोजगार मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर राज्यातील एकही रुग्ण हा रुग्णसेवेपासून वंचित राहणार नाही असे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे म्हणाले.

Web Title: Extends a helping hand, but does not measure - Chief Minister Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.