प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ! उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:39 AM2017-09-09T04:39:25+5:302017-09-09T04:40:09+5:30
सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने
मुंबई : सप्टेंबर महिना उजाडूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. विद्यापीठाने दबावाखाली येऊन बीए, बी.कॉम. आणि बी.एससीचे निकाल जाहीर केले, पण त्यातही गोंधळ असल्याने, आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढावली आहे.
मुंबई विद्यापीठाने शुक्रवार, ८ सप्टेंबर रोजी एक परिपत्रक काढले. या परिपत्रकात विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांना, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाच्या तारखेत मुदतवाढ दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ३१ आॅगस्टची डेडलाइन पाळण्यासाठी विद्यापीठाने महत्त्वाचे काही निकाल जाहीर केले, पण या निकालातही मोठ्या प्रमाणात गोंधळ दिसून आला आहे. आतापर्यंत तब्बल ५० हजार विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवल्याचे समोर आले आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पदवी अभ्यासक्रमाचे गुण अनिवार्य आहेत, पण सप्टेंबर महिना उजाडूनही विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमाचे गुण समजलेले नाहीत. संकेतस्थळावर आता विद्यार्थ्यांना निकाल समजणार असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे, पण तरीही अनेक विद्यार्थ्यांना निकाल दिसत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विद्यापीठात खेटे घालावे लागत आहेत. दरम्यान, या सर्व गोंधळानंतर विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याने, विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
उत्तरपत्रिका हरविल्याने विद्यार्थी नापास -
मुंबई : गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई विद्यापीठात आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सुरू असलेला गोंधळ अजूनही संपलेला नाही. विद्यापीठाने आतापर्यंत ४००हून अधिक निकाल जाहीर केले असले तरी तरी त्यातही अनेक विद्यार्थी नापास आहेत. काहींना शून्य गुण देण्यात आला आहे. पण, याचे खरे कारण म्हणजे या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे समोर येत आहे.
मुंबई विद्यापीठ यंदा १६०वे वर्ष साजरे करत आहे. त्यामुळे विद्यापीठाने काही नवीन उपक्रम सुरू केले. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला डिजिटल करण्यासाठी तसेच निकाल जलद लावण्यासाठी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात केली. कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी एप्रिल महिन्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असतानाच यंदापासून उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन पद्धतीने होईल अशी घोषणा केली. आॅनलाइन तपासणीमुळे लवकर निकाल लागतील असा विश्वास कुलगुरूंना होता.
प्रत्यक्षात उलटेच चित्र दिसून येत आहे. सप्टेंबर महिना उजाडूनही तब्बल ५० हजार उत्तरपत्रिकांची तपासणी झाली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच, ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत, त्यातही मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. अनेक हुशार विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. यापैकी काही विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाला आहे. तर, काही विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे चौकशी केल्यास उत्तरपत्रिका गहाळ असल्याचे सांगितले जाते. स्कॅनिंग प्रक्रियेत काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका इतरत्र गेल्याची भीती आहे. यावर आता विद्यापीठ काय तोडगा काढणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.