राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 08:13 PM2020-09-28T20:13:49+5:302020-09-28T20:23:57+5:30
राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने ३१ डिसेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
पुणे: कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकीला पुन्हा मुदतवाढ मिळाली. राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाने ३१ डिसेंबरपर्यंत निवडणुकांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील ४७ हजार २७५ संस्थांचे सध्याचेच संचालक मंडळ ३१ डिसेंबरपर्य़त कार्यरत असेल. सरकारने या संस्थांच्या निवडणुकांंना दिलेली.ही तिसरी मुदतवाढ आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. आता ३१ डिसेंबरपर्यंत या संस्थांची निवडणूक होणार नाही. न्यायालयाने निवडणूक घेण्याचा आदेश दिलेल्या संस्थांंची निवडणूक मात्र दिलेल्या मुदतीतच होईल.
राज्यातील सहकारी संस्थांची संख्या २ लाख ५८ हजार ७८६ आहे. गृहनिर्माण संस्थांपासून सहकारी सोसायट्यांपर्यंतच्या संस्थांचा त्यात समावेश आहे. दर ५ वर्षांनी त्यांच्या संचालक मंडळाची निवडणूक होत असते. कोरोनामुळे त्यांच्या निवडणुका लांबतच चालल्या आहेत.
दरम्यान निवडणूकांना स्थगिती देण्यात आली तरीही कामकाज नियमावलीनुसार संस्थेचे कामकाज सदस्यांंना विश्वासात घेऊन करण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. कोरोना सुरक्षेसाठी जाहीर केलेले नियम लक्षात घेऊन.संस्थेचे कामकाज करावे, मासिक सभा व्हिडिओ कॉन्फरन्सीने घ्याव्यात, सदस्यांना विषयपत्रिका मेल, व्हाटस अॅप करावी असे सांगण्यात आले आहे.