शेतकरी कर्जमाफी अर्जासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 05:22 AM2018-04-02T05:22:29+5:302018-04-02T05:22:29+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून १४ एप्रिल २०१८ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी अर्ज करण्याची ३१ मार्चची मुदत वाढवून १४ एप्रिल २०१८ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
योजनेची व वन टाइम सेटलमेंट योजनेची ३१ मार्चची मुदत आता ३० जून २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आहे. कर्जमाफीच्या घोषणेला नऊ महिने उलटले असले तरी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीपैकी फक्त १३ हजार कोटींचेच वाटप झाले आहे. ४० टक्के शेतकऱ्यांनाच आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी राज्य सरकारची कर्जमाफी फसवी असल्याची टीका करत शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्याचे म्हटले होते.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफीअंतर्गत राज्यातील ३५ लाख शेतकºयांच्या बँक खात्यांवर १३ हजार कोटी रुपये जमा केले असल्याची माहिती सरकारने दिली आहे. लाभधारक शेतकºयांच्या नावांची यादी सीडीच्या स्वरूपात सर्वपक्षीय आमदारांना देण्यात आली आहे.
नाशिकहून आलेल्या किसान सभेच्या मोर्चाला दिलेल्या लेखी आश्वासनात सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेत मुदत कर्जाचाही समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. मुदत कर्जामध्ये शेती, इमू पालन, शेडनेट, पॉलिहाउस यासाठीच्या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाचा समावेश करण्यात येणार आहे. २००८ मधील कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या २००१ ते ०९ पर्यंत थकीत असलेल्या खातेदारांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे.