नवीन महाविद्यालयांच्या परवानगीसाठी मुदतवाढ
By admin | Published: June 22, 2016 04:20 AM2016-06-22T04:20:05+5:302016-06-22T04:20:05+5:30
राज्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठीची मुदत १५ जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
मुंबई : राज्यात नवीन महाविद्यालयांना परवानगी देण्यासाठीची मुदत १५ जूनऐवजी ३१ जुलैपर्यंत वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. त्यासाठी आता अध्यादेश काढण्यात येणार आहे. आघाडी सरकारने नेमलेल्या डॉ.नरेंद्र जाधव समितीने नवीन महाविद्यालयांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावेत, असे म्हटले होते. त्यानुसार २०१६-१७ मध्ये परवानगी हवी असलेल्या संस्थांनी ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत शासनाकडे अर्ज केले होते. अर्जातील त्रुटी दूर करण्याची संधी या संस्थांना दिली जाते.
या त्रुटी दूर करून परवानगी मिळविण्यासाठी १५ जूनपर्यंतची मुदत कमी पडते, असा सर्वच अर्जदार संस्थांचा सूर होता. (विशेष प्रतिनिधी)
इचलकरंजी नगरपालिकेचे इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल सार्वजनिक आरोग्य विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरपालिकेने तशी मागणी केली होती. आजच्या निर्णयामुळे या रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे शासनाला शक्य होणार आहे. रुग्णालय हस्तांतरणाची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे.३५० खाटांचे हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालविणे शासनाला शक्य होणार आहे.
ज्यू धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा
राज्यातील ज्यू धर्मियांना अल्पसंख्यांकाचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. राज्यातील मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी (झोराष्ट्रीयन) व जैन धर्मियांना आधीपासूनच हा दर्जा आहे. हा दर्जा देण्याची मागणी इंडियन ज्युईश फेडरेशनने शासनाकडे केली होती. ज्यू धर्मियांची राज्यातील लोकसंख्या दोन ते अडीच हजार आहे. आजच्या निर्णयामुळे राज्यातील ज्यू धर्मीय लोकसंख्येची गणना करणे शक्य होणार आहे. तसेच अल्पसंख्याकांच्या विकासासाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ ज्यू धर्मीयांना घेता येणार आहे.