राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 08:57 PM2024-07-17T20:57:06+5:302024-07-17T20:58:06+5:30

सुधारित वेळापत्रक कसे असणार, जाणून घ्या

Extension of admission to agricultural courses in the state; Students can apply till 22 July! | राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार!

राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मुदतवाढ; विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज भरता येणार!

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमी प्रवेशाला मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) घेतला आहे. त्यामुळे आता कृषी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तर प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी ४ ऑगस्टला जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली.

राज्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातून वीज पुरवठा बाधित झाल्याच्या घटना घडताना दिसत आहेत. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळण्यास विलंब होत आहे. यापूर्वी १५ जुलैपर्यंत प्रवेश अर्ज भरण्याची मुदत सीईटी सेलने दिली होती. मात्र या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.

कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या बी.एस्सी अ‍ॅाग्रीकल्चर, बी.एस्सी (हॉर्टिकल्चर), बी.एस्सी (फॉरेस्ट्री), बी.एफ.एस्सी (फिशरी), बी.टेक (फूड टेक्नोलॉजी), बी.टेक (बायो टेक्नोलॉजी), बी.टेक (अ‍ॅमग्रीकल्चर इंजिनियरिंग), बी.एस्सी कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी अ‍ॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट या नऊ शाखांच्या प्रवेशासाठी आता विद्यार्थ्यांना २२ जुलैपर्यंत अर्ज सादर करता येतील.

कृषी अभ्यासक्रमाची महाविद्यालये किती

यंदा राज्यात कृषी अभ्यासक्रमाची तीन अनुदानित, तर एक विनाअनुदानित अशी चार नवी महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत. राज्यामध्ये यंदा कृषी अभ्यासक्रमांसाठी २०३ महाविद्यालयांमध्ये १७ हजार ९२६ जागा उपलब्ध आहेत. यातील महाविद्यालये ४७ शासकीय, तर १५६ खासगी आहेत. शासकीय महाविद्यालयांमध्ये ३ हजार ६८६ जागा, तर खासगी महाविद्यालयांमध्ये १४ हजार २४० इतक्या जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

सुधारित वेळापत्रक असे असणार

  • प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत  - २२ जुलै
  • अंतरिम गुणवत्ता यादी - २६ जुलै
  • या गुणवत्ता यादीवर हकरत व तक्रार नोंदणी - २७ जुलै ते २९ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविण्यास सुरुवात - १ ऑगस्ट ते २ ऑगस्ट
  • पहिली प्रवेश यादी - ४ ऑगस्ट
  • प्रवेश घेण्याचा कालावधी - ५ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट
  • दुसर्‍या फेरीची यादी - ११ ऑगस्ट
  • तिसर्‍या फेरीची यादी जाहीर - १९ ऑगस्ट
  • वर्ग सुरु होणार -  २६ ऑगस्ट

Web Title: Extension of admission to agricultural courses in the state; Students can apply till 22 July!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.