दहावीच्या परीक्षेचा निकाल लावण्यासाठी हवी मुदतवाढ; शिक्षक, मुख्याध्यापकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 08:25 AM2021-06-11T08:25:49+5:302021-06-11T08:26:08+5:30
exam result : जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन होते त्यांचे गुणदान करणे शक्य आहे. परंतु जे ऑनलाईन नव्हते, त्यांना संपर्क करून, चाचण्या, स्वाध्याय, तोंडी परीक्षा घेऊन निकालाचे काम पूर्ण करणे अवघड आहे.
मुंबई : दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर शिक्षण मंडळाने अंतर्गत मूल्यमापनाची कार्यपद्धती, तपशील जाहीर केला. संभ्रमावस्थेत असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांना मंडळाच्या यू ट्यूब चॅनेलवरून प्रशिक्षणही दिले. मात्र, अंतर्गत निकालाचे काम आव्हानात्मक असून, त्यासाठी १५ दिवसांचा कालावधी वाढवून देण्याची मागणी शाळा, मुख्याध्यापक, शिक्षकांनी केली आहे.
जे विद्यार्थी वर्षभर ऑनलाईन होते त्यांचे गुणदान करणे शक्य आहे. परंतु जे ऑनलाईन नव्हते, त्यांना संपर्क करून, चाचण्या, स्वाध्याय, तोंडी परीक्षा घेऊन निकालाचे काम पूर्ण करणे अवघड आहे. अनेक विद्यार्थी अजूनही मुंबई किंवा शाळेच्या मूळ ठिकाणी नाहीत. या अडचणी सोडवण्याचा विचार करावा, अशी मागणी शिक्षण अभ्यासक, समुपदेशक शिक्षक अशोक वेताळ यांनी केली.
तर, सवलतीच्या कला गुणांविषयी अजूनही संभ्रम असून, त्याबद्दल स्पष्टता आणावी, अशी मागणी मुंबई मुख्याध्यापक संघाचे सचिव पांडुरंग केंगार यांनी दिली.