राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर
By Admin | Published: August 8, 2015 01:51 AM2015-08-08T01:51:10+5:302015-08-08T01:51:10+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजपाच्या वाट्याला जेमतेम तीन ते चार मंत्रीपदे येणार असून, उर्वरित सहा ते सात मंत्रीपदे शिवसेना आणि भाजपाच्या मित्रपक्षांना मिळणार आहेत
संदीप प्रधान, मुंबई
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यास भाजपाच्या वाट्याला जेमतेम तीन ते चार मंत्रीपदे येणार असून, उर्वरित सहा ते सात मंत्रीपदे शिवसेना आणि भाजपाच्या मित्रपक्षांना मिळणार आहेत. भाजपाच्या वाट्याच्या अत्यल्प मंत्रीपदाकरिता किमान १५ ते २० इच्छुक असल्याने भाजपा मंत्रिमंडळ विस्ताराकरिता फारसा उत्सुक नसून तसे त्यांनी शिवसेनेला कळविल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात ती चर्चा फुसका बार ठरली. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी पुढील अधिवेशनापूर्वी, असे उत्तर देऊन भाजपाला सध्या विस्तारात रस नसल्याचे संकेत दिले.
सेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले की, मंत्रिमंडळ विस्तारात चार मंत्रीपदे रिपाइं, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी
आणि शिवसंग्राम या पक्षांना द्यावी लागतील. शिवसेनेला तीन मंत्रीपदे दिल्यावर भाजपाकडे केवळ
तीन मंत्रीपदे राहतात. याकरिता
पांडुरंग फुंडकरांपासून शोभाताई फडणवीसांपर्यंत आणि आशिष शेलार यांच्यापासून राज पुरोहित यांच्यापर्यंत किमान १५ ते २० जण इच्छुक आहेत. त्यामुळे सध्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री व भाजपा फारसे उत्सुक नाहीत व तसे संकेत प्राप्त झाले आहेत.