निविदा भरण्यास मुदतवाढ : सिडकोचा निर्णय
By admin | Published: January 10, 2017 12:55 AM2017-01-10T00:55:31+5:302017-01-10T00:55:31+5:30
मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी उभारायच्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी ठरलेल्या मुदतीत एकमेव निविदा आल्याने ‘सिडको’ने निविदा
मुंबई : मुंबई विमानतळावरील ताण कमी करण्यासाठी उभारायच्या प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाच्या कामासाठी ठरलेल्या मुदतीत एकमेव निविदा आल्याने ‘सिडको’ने निविदा भरण्यासाठी आणखी दोन आठवडे मुदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
हे नवे विमानतळ उभारून त्याचे परिचालन करण्याच्या कामासाठी ‘सिडको’ने इच्छुकांकडून निविदा मागविल्या होत्या. यासाठी सोमवारी दुपारी ३पर्यंत मुदत होती. तोपर्यंत मुंबई विमानतळाचे परिचालन करणाऱ्या ‘जीव्हीके ग्रुप’ची एकमेव निविदा प्राप्त झाली. त्यामुळे त्यांची वित्तीय निविदा न उघडता मुदत वाढविण्याचे ठरविण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले.
इतर इच्छुकांना निविदा दाखल करण्याची संधी मिळावी व असमर्थता दर्शविणाऱ्या तीन कंपन्यांना फेरविचार करण्यास वेळ मिळावा यासाठी आलेली एकमेव निविदा न उघडता आणखी मुदत देण्याचे ठरले, असे सूत्रांनी सांगितले. निविदा स्पर्धात्मक असाव्यात व त्याद्वारे उत्तम अटी व शर्तींवर विमानतळाचे काम व्हावे, हाही यामागचा हेतू आहे. मुदतवाढ दिल्याने जीव्हीके ग्रुपलाही सुधारित निविदा दाखल करण्याची संधी मिळेल.
जीएमआर ग्रुप सध्या दिल्ली व हैदराबाद विमानतळांचे परिचालन करते. शिवाय गोव्यातील दुसरा विमानतळ उभारण्याचे कामही अलीकडेच त्यांना मिळाले आहे. कंपनीने सरकारला पत्र लिहून नवी मुंबई विमानतळाच्या कामातील अनेक अडचणींकडे लक्ष वेधले होते. या सर्वांचा विचार करूनच निविदांचे प्रारूप तयार केले गेले होते. ‘सिडको’ ही केवळ हे काम करून घेणारी संस्था असल्याने निविदांमध्ये फेरबदल करण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यासाठी या कामावर देखरेख करण्यास सरकारने नेमलेल्या समितीपुढे हा विषय न्यावा लागेल. तसे केल्यास आधीच विलंब झालेले हे काम आणखी रखडेल. (विशेष प्रतिनिधी)
याआधी ‘सिडको’ने निविदापूर्व पात्रता बैठक घेतली होती, तेव्हा ‘जीव्हीके ग्रुपखेरीज जीएमआर ग्रुप, टाटा रिअॅलिटी व हिरानंदानी ग्रुप व झ्युरिच एअरपोर्ट यांची संयुक्त कंपनी पात्र ठरली होती.
मात्र प्रकल्प पूर्ण होण्यातील अनेक संभाव्य अडचणी व निविदेमधील कठोर अटींचे कारण देत टाटा, जीएमआर व हिरानंदानी यांनी निविदा भरण्यात आपल्याला स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले होते.