नवी मुंबई विमानतळाच्या निविदा भरण्यास पुन्हा मुदतवाढ
By admin | Published: January 26, 2017 05:29 AM2017-01-26T05:29:35+5:302017-01-26T05:29:35+5:30
बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निविदा भरण्याचा आज अखेरचा दिवस होता. या मुदतीत जीव्हीकेची एकमेव निविदा
नवी मुंबई: बहुचर्चित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या निविदा भरण्याचा आज अखेरचा दिवस होता. या मुदतीत जीव्हीकेची एकमेव निविदा सिडकोला प्राप्त झाली. त्यामुळे इतर पात्र कंपन्यांना अखेरची संधी देण्याच्या उद्देशाने निविदा भरण्यासाठी पुन्हा १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या निविदा प्रक्रियेला आतापर्यंत पाच वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे.
सुमारे पंधरा हजार कोटी रुपये खर्चाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या निविदा सादर करण्यासाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा रियालिटी-एमआयए इन्फ्रास्ट्रक्चर आणि झ्युरीच एअरपोर्ट-हिरानंदानी ग्रुप या चार कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांकडून अंतिम आर्थिक निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. ९ जानेवारी २0१७ ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत देण्यात आली होती. (प्रतिनिधी)