डीबीटी पोर्टलवर विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:06 PM2022-01-13T18:06:04+5:302022-01-13T18:09:36+5:30
DBT portal News: महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मुंबई - महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी सवलतींचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारी पर्यंत मुदतवाढ देण्याची घोषणा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
त्याचबरोबर २०२० - २१ या वर्षात अर्ज केलेले मात्र त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना देखील त्रुटींची पूर्तता करणे किंवा अर्जात दुरुस्ती करण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील सुमारे ४.७० लाख विद्यार्थी दरवर्षी डीबीटी पोर्टलवरून वरील सवलतींचा लाभ घेत असतात. यावर्षी यासाठी अर्ज करणे किंवा अर्जाचे नूतनीकरण करण्यास १२ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती.
काही कोर्सेसचे सीईटीचे राऊंड अजूनही सुरू आहेत, त्यामुळे दिनांक १२ जानेवारीपर्यंत केवळ १.१६ लाख विद्यार्थीच डीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकले आहेत. याचाच विचार करून, पात्र असलेले लाभार्थी शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी आदी लाभांपासून वंचित राहू नयेत यासाठी डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास किंवा मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले. तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी ३१ जानेवारीच्या आत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असे आवाहनही धनंजय मुंडे यांनी केले आहे.