मतदार नोंदणीसाठी २१ आॅक्टोबरपर्यंत मुदतवाढ
By admin | Published: October 17, 2016 04:30 AM2016-10-17T04:30:33+5:302016-10-17T04:30:33+5:30
राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली
मुंबई : राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असून, आता २१ आॅक्टोबरपर्यंत नागरिकांना आपल्या नावाचा समावेश, नाव वगळणे अथवा दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसाठी हीच यादी ग्राह्य धरली जाणार असल्याने या निवडणुकीत मतदान करू इच्छिणाऱ्या नवमतदारांसाठी नाव नोंदणीसाठी ही अंतिम संधी असणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १४ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांच्या छायाचित्र मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या मोहिमेला एक आठवड्याची मुदतवाढ देण्यात आली असून, आता २१ आॅक्टोबरपर्यंत नाव नोंदणी, दुरुस्ती अथवा स्थलांतरासाठी मतदारांना अर्ज करता येणार आहे. १६ सप्टेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत ज्या पात्र मतदारांची नावे समाविष्ट केली नसतील अथवा यादीतील नोंदीत सुधारणा, दुरुस्ती करायच्या असतील अशा मतदारांनी २१ आॅक्टोबरपर्यंत आपल्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात तसेच अतिरिक्त मदत केंद्रांवर अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
लोकप्रतिनिधी अधिनियम, १९५०च्या तरतुदीनुसार पूर्वीच्या मतदार यादीतील मयत, स्थलांतरित तसेच दुबार नाव नोंदणी असलेल्या मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. वगळण्यात आलेल्या नावांची अतिरिक्त यादी या मतदार नोंदणी कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. तरी नागरिकांनी या वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. (प्रतिनिधी)