तूर खरेदी केंद्रांना मुदतवाढ- फुंडकर
By Admin | Published: April 17, 2017 03:02 AM2017-04-17T03:02:07+5:302017-04-17T03:02:07+5:30
नाफेड’मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रांना आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा कृषीमंत्री पांडुंरंग फुंडकर यांनी केली
वाशिम : ‘नाफेड’मार्फत सुरू असलेल्या तूर खरेदी केंद्रांना आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा कृषीमंत्री पांडुंरंग फुंडकर यांनी केली. राज्यातील ३०० खरेदी केंद्रांवर आतापर्यंत सुमारे ३३ लाख क्विंटल तूर हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांची तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असल्याने हा निर्णय घेण्यात आला.
कारंजा येथे एका खासगी कृषी बाजारच्या उद्घाटनप्रसंगी फुंडकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत होते. यावेळी फुंडकर म्हणाले की, नाफेडमार्फत तूर खरेदी केंद्रांची मुदत शनिवार संपणार होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी तूर खरेदीची मुदत आणखी सात दिवस वाढवून देत आहे. ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी टोकन देण्यात आले त्यांची मोजणी प्राधान्याने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ही मोजणी झाल्यानंतर नव्याने आलेल्या तुरीचा विचार होईल.
काही व्यापारी शेतकऱ्यांचा सातबारा घेऊन नाफेड केंद्रावर तूर विक्रीसाठी आणत आहेत. अशा प्रकारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सरकारचा विरोध नाही. योग्य वेळ आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)