Breaking ; सोलापूर विद्यापीठातील बहिस्थ विभाग झाला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 03:36 PM2019-08-01T15:36:40+5:302019-08-01T15:40:01+5:30
युजीसीच्या नव्या नियमांचा बसला फटका; सुमारे एक हजार विद्यार्थ्यांपुढे प्रवेशाचा प्रश्न
सोलापूर : नोकरी करुन शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असणारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बहिस्थ अभ्यासक्रम बंद करण्यात येणार आहे. युजीसीची (विद्यापीठ अनुदान आयोग) मान्यता घेण्याचे प्रलंबित असल्यामुळे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात किमान एक हजार विद्यार्थी हे विविध अभ्यासक्रमासाठी दरवर्षी प्रवेश घेत असतात. अशा विद्यार्थ्यांपुढे आता प्रवेश घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बहिस्थ विभाग सुरु ठेवण्यासाठी युजीसीने नवे नियम लागू केले आहेत. याचा फटका विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाला बसला आहे. विद्यापीठाने बहिस्थ विभागासाठी स्वतंत्र मान्यता घ्यावी, विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची निर्मिती करावी असे नियम नव्याने लागू करण्यात आले आहेत. सध्या सोलापूर विद्यापीठाला बहिस्थ विभागाच्या प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पुस्तकांची निर्मिती करणे कठीण जाणार आहे. तसेच बहिस्थ विभाग सुरु करण्यासाठी नॅकचे ३.२५ सीजीपीए मानांकन मिळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सोलापूर विद्यापीठाच्या नॅकचे मानांकन २.६२ सीजीपीए इतके आहे. यामुळे विद्यापीठाला बहिस्थ विभाग सुरु ठेवता येणे शक्य नाही.
ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी सोलापूर विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात प्रवेशित घेतला आहे. त्यांना त्यांचा अभ्यासक्रमाचा कालावधी व अधिकचे दोन वर्षांत विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाकडून पदवी मिळवता येणार आहे. आधीच प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना अडचण येणार नाही.
बहिस्थ अभ्यासक्रम प्रवेशोच्छुक विद्यार्थ्यांनी काय करावे ?
- अनेक विद्यार्थी हे काम करत शिकत असतात. त्यामुळे ते विद्यापीठाच्या बहिस्थ विभागाच्या प्रवेशावर अवलंबून असतात. यंदा बहिस्थ विभाग बंद झाल्याने सुमारे एक हजार विद्यार्थ्यांसमोर आता पुढे काय असा प्रश्न आहे. सध्या सोलापूर विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. तिथे हे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात; मात्र त्यांना आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमी आहे. तसेच शहर व जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयात चालविण्यात येणाºया अभ्यासक्रमास प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी समाधानाची बाब म्हणजे मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी मुदत संपलेली असताना १६ आॅगस्टपर्यंत विलंब शुल्क देऊन प्रवेश घेता येणार आहे. यासोबतच शिवाजी विद्यापीठाच्या बहिस्थ विभागात प्रवेश घेण्याचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे आहे.
बहिस्थ विभाग सुरुच रहावा यासाठी युजीसीकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठ तुलनेने नवे असल्याने विशेष बाब म्हणून मान्यता देण्याची विनंती करण्यात आली आहे; मात्र सध्या विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या बहिस्थ विभागातून प्रवेश देणे नियमात बसत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या काळात बहिस्थ विभाग सुरु करणे व त्यासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
- डॉ. श्रीकांत कोकरे
संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ