बाहेरगावी जाताय, सावधान!
By admin | Published: September 18, 2016 12:50 AM2016-09-18T00:50:30+5:302016-09-18T00:50:30+5:30
शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली
भोर : शहरात व शहराच्या आसपासच्या गावांतील बंद घरांचे कुलूप तोडून चोऱ्यांच्या प्रमाणात अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ महिन्यांत ८ ते १० घरे फोडून चोऱ्या झाल्या आहेत, तर ५ दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत, स्टँडवर व इतरत्र अशा १० चोऱ्या असे एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अनेक जण गुन्हे दाखल करीतच नाहीत. यामुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेरगावी जाताय, सावधान! घराला कुलूप हमखास चोरी होणार. चोऱ्यांमुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री-अपरात्री घराबाहेर पडता येत नाही. भोर पोलिसांच्या कामकाजाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
मागील महिनाभरात शहरातील शेवटची गल्ली भेलकेवाडीत गणपती सणाला गावाला गेलेल्या बंद घरांच्या दरवाजाची कडी तोडून घरातील किमती वस्तू, रोख रक्कम, दागिने चोरट्यांनी चोरून नेले. तर, उत्रौली येथील चार बंद घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून जबरी चोऱ्या केल्या आहेत. एसटी स्टाँडवर व बाजारात गर्दीचा फायदा घेत मोबाईल, पाकीट,मंगळसूत्र व इतर सोन्याच्या वस्तूंच्या चोऱ्या होतात. आठवड्यापूर्वी पिराचामळा, भोरेश्वरनगर येथे रात्री साडेदहा वाजता चोरटे चोरी करण्याच्या उद्देशाने आले होते. मात्र, नागरिक जागे असल्याने चोरटे पसार झाले. ग्रामीण भागातही अशाच पद्धतीने चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिनाभरात ८ ते १० घरांत चोऱ्या झाल्या आहेत. यामुळे नागरिक रात्री-अपरात्री घराबाहेर पडत नसून लोकांमध्ये घबराट पसरली आहे. भोर पोलिसांत दरवेळी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला जातो आणी तपास सुरू असल्याचा फार्स केला जातो. मात्र, प्रत्यक्षात हातात काहीच लागत नाही. अशा गुन्ह्यातील एकही आरोपी सापडला नसून कशाचाही तपास लागलेला नाही. यामुळे भोर पोलीस निरीक्षकांच्या कामकाजाबद्दल शंका व्यक्त केली जात असून सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त क रीत आहेत.
भोर पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या ५ गाड्या चोरीपैकी ३ गाड्या परत मिळाल्या आहेत. तर, तीन घरफोड्या करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून गुन्हा कबुल केल्याचे भोर पोलिसांकडून सांगण्यात आले.
(वार्ताहर)
>बंद घरांची टेहाळणी : चोरांचा प्रवेश
भोर शहरातील अनेक आळीतील बंद घरांची दिवसा टेहळणी करून, रात्रीच्या वेळी आजूबाजूच्या घरांच्या दरवाजाच्या बाहेरून कड्या लावून कोणीही मदतीला येणार नाही, याची खबरदारी घेऊन कटावणीने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करतात. घरातील सोने-नाणे, किमती वस्तू पैसे चोरटे चोरूक्षन नेत आहेत.