मलिद्यासाठीच हद्दवाढ
By admin | Published: June 13, 2015 12:46 AM2015-06-13T00:46:20+5:302015-06-13T00:50:24+5:30
उद्योजकांचा आरोप : उद्योग विकून सरळ गुजरातमध्ये जाण्याचा इशारा
सतीश पाटील - शिरोली -कोल्हापूर महापालिकेला प्रामुख्याने शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत या कोट्यवधींची उलाढाल असलेल्या गावांची हद्दवाढ करायची आहे, ती मलिद्यासाठीच. महापालिकेने हद्दवाढीचा बाजार मांडला आहे. शहराचा विकास राहिला बाजूला आणि उठायचे, सुटायचे हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून महापालिकेत दिंडोरा पिटतात. हद्दवाढ झाल्यास उद्योग बंद ठेवू किंवा उद्योग विकून सरळ गुजरातला जाऊ, अशा तीव्र प्रतिक्रिया गोकुळ शिरगाव आणि शिरोली येथील उद्योजकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिल्या.
उद्योजक म्हणाले, हद्दवाढ पाहिजे म्हणणाऱ्या नगरसेवकांनी शहरातील उद्यमनगर, वाय. पी. पोवारनगर या सर्वांत जुन्या औद्योगिक वसाहतींना सुविधा दिलेल्या नाहीत. रस्ते खराब आहेत, ड्रेनेज सुविधा नाहीत, सांडपाणी रस्त्यावर येते. या भागाचा गेल्या चाळीस वर्षांत विकास झाला नाही आणि आम्हाला हद्दवाढीत घेऊन कशा सुविधा देणार. दोन्ही एमआयडीसींचा हद्दवाढीत समावेश झाला, तर उद्योजकांना महापालिकाही सुविधा देऊ शकणार नाही आणि औद्योगिक विकास महामंडळ ही सुविधा देणार नाही, त्यामुळे उद्योजकांचे मोठे नुकसान होणार आहे, आमच्या औद्योगिक वसाहतींचा विकास करण्यासाठी आम्ही सर्व उद्योजक, औद्योगिक संस्था, शिरोली मॅन्युफॅक्चरर्सअसोसिएशन (स्मॅक), गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (गोशिमा) समर्थ आहे. आम्हाला महापालिकेची सहानुभूती नको. महापालिकेने हद्दवाढीत नागरी वस्तीचा सहभाग केला पाहिजे. औद्योगिक वसाहतीत नागरी वस्ती नसताना फक्त औद्योगिक वसाहतींच्या करावर महापालिकेचा डोळा आहे, म्हणूनच हद्दवाढीचा घाट घातल्याचा आरोप उद्योजकांनी केला. शहरातील उपनगरांना सुविधा नाहीत, तर आम्हाला काय मिळणार? आमची ग्रामपंचायत सक्षम आहे, आम्हाला हद्दवाढीत यायचे नाही. आमचा हद्दवाढीत समावेश केलाच, तर आम्ही आमचे व्यापार आणि उद्योग जागा मिळेल तिथे स्थलांतरित करणार, पण हद्दवाढीत जाणार नाही, असा इशारा देत हद्दवाढ झाल्यास उद्योग बंद ठेवणार किंवा उद्योग विकून सरळ गुजरातला जाणार, अशा तीव्र प्रतिक्रिया उद्योजकांनी दिल्या.
/ प्रतिक्रिया १0 वर
शिरोली सोमवारी बंद
कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात सोमवारी (दि. १५) शिरोली बंदची हाक शुक्रवारी शिरोली हद्दवाढ कृती समितीने दिली आहे. हद्दवाढ विरोधासाठी लोकप्रतिनिधींची शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या धर्मवीर संभाजीराजे सभागृहात बैठक झाली. यावेळी हद्दवाढीच्या विरोधात टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय झाला. अध्यक्षस्थानी सरपंच बिसमिल्ला महात होत्या. / वृत्त १0
शहराच्या हद्दवाढीत आम्हाला जायचे नाही, महापालिकेने जबरदस्तीने हद्दवाढ लादली, तर आम्ही सर्व उद्योजक उद्योग बंद ठेवणार आणि कागल पंचतारांकित, अर्जुनी, टोप, वाठार येथे जागा मिळेल तिथे उद्योग स्थलांतरित करणार. - अजित आजरी, गोशिमा, अध्यक्ष