सनी लिओनीविरूद्धचा गुन्हा निकाली
By Admin | Published: September 30, 2016 03:07 PM2016-09-30T15:07:47+5:302016-09-30T15:14:51+5:30
वेबसाईटवर अश्लील व आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ टाकल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री, पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा निकाली काढण्यात आला
>ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. ३० - वेबसाईटवर अश्लील व आक्षेपार्ह फोटो आणि व्हीडिओ टाकल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री, पॉर्नस्टार सनी लिओनी हिच्याविरोधात चिपळूण पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेला गुन्हा निकाली काढण्यात आला आहे. चिपळूणमधील शिवसेनेच्या एका महिला कार्यकर्तीने तक्रार दिली होती. हे आक्षेपार्ह छायाचित्र व व्हिडिओ विदेशातून अपलोड झाले असल्यामुळे हा गुन्हा निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चिपळूणमधील रेश्मा लक्ष्मण पवार या शिवसेना कार्यकर्तीने २३ मे २०१५ रोजी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता. अश्लिल व्हीडीओ आणि छायाचित्रे वेबसाईटवर टाकून बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने अश्लिलता पसरवली असल्याची तक्रार यातून करण्यात आली होती. सनी लिओन व एका अनोळखी इसमाने एकमेकांच्या संगनमताने ही छायाचित्रे प्रसारित केला असल्याचा आरोपही करण्यात आला होता. चिपळूण पोलीस स्थानकात या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा सायबर सेलकडून हाताळण्यास सुरूवात झाली. सनी लिओनीविरूद्धची याच प्रकाराची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यातही दाखल झाली होती आणि तेथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. ठाणे पोलिसांकडून याबाबत सनी लिओनीची चौकशी करण्यात आली होती. हे व्हिडिओ व छायाचित्र विदेशातूनच अपलोड झाल्याचे तपासात व सनी लिओनी हिच्या चौकशीतून पुढे आले आहे. त्यानंतर झालेल्या सेंट्रल इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम या केंद्र शासनाच्या संस्थेने संबंधित वेबसाईटवर बंदी घातली आहे. एकतर ही वेबसाईट परदेशातून हाताळली जाते आणि आता त्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ही तक्रार निकाली काढण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. गुन्हा निकाली काढून संबंधित प्रकरणाची माहिती ठाणे सायबर सेलकडे पाठवून देण्यात आली आहे. गुन्हा निकाली निघाल्यामुळे अभिनेत्री सनी लिओनीला दिलासा मिळाला आहे.