खंडणीखोरांना सोडणार नाही आणि राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठीशी घालू नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 17:13 IST2024-12-19T16:02:41+5:302024-12-19T17:13:53+5:30
मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याकडेच रोख असल्याचं पाहायला मिळालं.

खंडणीखोरांना सोडणार नाही आणि राजकीय नेत्यांनीही त्यांना पाठीशी घालू नये; मुख्यमंत्र्यांचा इशारा
CM Devendra Fadnavis ( Marathi News ) : "गुजरात पुढे आहे, असं विरोधकांनी सतत म्हणू नये. कारण महाराष्ट्र यापूर्वीही नंबर एक होता आणि यापुढेही नंबर एकच राहणार नाही. सर्व बाबतींमध्ये आपण गुजरातसहीत सर्व राज्यांच्या पुढे आहोत. थेट परकीय गुंतवणुकीमध्ये आपण देशात नंबर एक आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर विधानसभेत केलेल्या पहिल्याच भाषणात आज चौफेर फटकेबाजी केली. तसंच यावेळी फडणवीस यांनी राज्यात उघड झालेल्या खंडणीच्या प्रकरणांवरून अप्रत्यक्षरीत्या आक्रमक इशारा दिला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. मात्र माझी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून अपेक्षा एवढीच आहे की, खंडणीखोरांना पाठीशी घालू नका. बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथं जी घटना घडली त्यावर मी नंतर उत्तर देणारच आहे. पण अशा प्रकारे गुंतवणूकदारांना त्रास देणे, खंडणी वसूल करणे अशा प्रकारच्या घटना घडल्या तर गुंतवणूक येणार नाही. जे सगळे वसूलीबाज आहेत, ते कोणा ना कोणाचा आसरा घेतात. त्यामुळे माझ्या पक्षासहीत सगळ्या पक्षाच्या लोकांना विनंती आहे की, आपण वसुलीबाजांना आसरा देण्याचं बंद केलं तर महाराष्ट्राची गती दुप्पटीने वाढेल. वसुली प्रकरणात जो असेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल," असा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी कोणाचंही नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख बीडमध्ये पवनचक्की कंपनीच्या तक्रारीनंतर वाल्मिक कराड आणि अन्य काही आरोपींवर दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याकडेच असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मस्साजोग इथं घडलेले सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण आणि त्या प्रकरणाशीच संबंधित पवनचक्की कंपनीकडे मागण्यात आलेल्या खंडणीबाबत आज सविस्तर भाष्य करणं टाळलं असून ते उद्या सभागृहात याबाबत सरकारची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
बीडमधील खंडणी प्रकरण नेमकं काय आहे?
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. ज्या पवनचक्की कंपनीच्या कार्यालय परिसरात झालेल्या वादावरून ही हत्या करण्यात आली त्या पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यासह तिघांविरोधात केज पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे हे मागील एका वर्षापासून अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवनऊर्जा प्रकल्पाची मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय आहे. २९ नोव्हेंबर रोजी शिंदे यांच्या मोबाइलवर विष्णू चाटे यांनी फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे सांगितले. त्यानंतर 'अरे, काम बंद करा. ज्या परिस्थितीमध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा,' असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद करण्याची धमकी दिली. त्याच दिवशी दुपारी सुदर्शन घुले हे कार्यालयात आले आणि पुन्हा धमकी दिली. 'काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू,' अशी धमकी दिली. काही दिवसांपूर्वी कंपनीचेच शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड यांनी त्यांच्या परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा, असे सांगितले होते. काम चालू ठेवायचे असेल तर दोन कोटी रुपये द्या, अशी मागणी करण्यात आली होती.