शिक्षकांवर ‘अतिरिक्त’ संकट
By admin | Published: August 29, 2015 02:37 AM2015-08-29T02:37:28+5:302015-08-29T02:37:28+5:30
विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक नियुक्तीचे नवे निकष असलेले आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळेत ६० विद्यार्थ्यांमागे दोन, उच्च प्राथमिक
मुंबई : विद्यार्थीसंख्येनुसार शिक्षक नियुक्तीचे नवे निकष असलेले आदेश राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केले आहेत. त्यानुसार प्राथमिक शाळेत ६० विद्यार्थ्यांमागे दोन, उच्च प्राथमिक शाळेत ३५ विद्यार्थ्यांमागे दोन तर माध्यमिक शाळेत ४० विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असणे अनिवार्य केले आहे. या निर्णयामुळे शिक्षकांवर अतिरिक्त होण्याचे संकट कोसळेल, अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र ही भीती अनाठायी ठरवत उलट अधिक शिक्षकांची गरज भासेल, असा दावा सरकारने केला आहे.
नव्या निकषांनुसार प्राथमिक (इयत्ता १ ली ते ४थी किंवा १ली ते ५वी) शाळांमध्ये ६० विद्यार्थ्यांमागे दोन शिक्षक असतील व त्यानंतर वाढ होणाऱ्या प्रत्येक ३० विद्यार्थ्यांमागे एक अतिरिक्त शिक्षक नियुक्त करावा लागेल. एखाद्या प्राथमिक शाळेत वर्ग ३ किंवा ४ किंवा ५ मध्ये एकाच वर्गात कमीत कमी २० पेक्षा अधिक विद्यार्थी असतील, तर त्या वर्गासाठी वेगळे शिक्षक नेमावे लागतील. मात्र तुकडी व्यवस्था बंद करण्यात आल्याने संपूर्ण शाळेत शिकत असलेल्या एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संख्या त्यासाठी विचारात घ्यावी लागेल.
उच्च प्राथमिक शाळा (इयत्ता ५वी ते ७वी किंवा ६वी ते ८वी) नवीन शाळा सुरू होत असल्यास आणि पहिल्या वर्षी फक्त सहावा वर्ग असल्यास ३५ विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक (एक विज्ञान-गणित आणि एक भाषा) नियुक्त करावा लागेल.
मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकांची पदे
प्राथमिक शाळा - नवीन शाळेत विद्यार्थीसंख्या १५० पेक्षा अधिक झाल्यास मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी लागेल, तर सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांत विद्यार्थीसंख्या १३५ पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार नाही.
उच्च प्राथमिक शाळा - नवीन शाळेत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी लागेल, तर सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार नाही.
माध्यमिक शाळा - १०० पेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास मुख्याध्यापकाची नियुक्ती करावी लागेल, तर सध्या अस्तित्वातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ९० पेक्षा कमी झाल्यास मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय राहणार नाही.
तुकडी व्यवस्था बंद केल्यामुळे ज्या वर्गामध्ये निकषापेक्षा अधिक विद्यार्थी झाल्यास जादा शिक्षक पद देण्यात येईल. अशा अतिरिक्त शिक्षकाने वर्ग भरवण्याकरिता त्या शाळेने अतिरिक्त खोली बांधल्या-नंतरच ते पद भरण्याची परवानगी देण्यात येईल.
शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार हा निर्णय घेतला असून, यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना त्याच तालुक्यात नियुक्त केले जाणार आहे. उलटपक्षी या निर्णयामुळे शिक्षकांची नवीन ३ ते ४ हजार पदे भरावी लागतील. त्यामुळे कुठल्याही शिक्षकाची नोकरी जाणार नाही. -विनोद तावडे, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र
शिक्षण हक्क कायद्यानुसार घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका ९वी व १०वी या माध्यमिक शाळांतील शिक्षकांना बसणार आहे. यामुळे माध्यमिक शाळांमध्ये तीनऐवजी एका शिक्षकाची गरज राहील. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील. - रामनाथ मोते, शिक्षक आमदार