शिक्षण संस्थांना जादा एफएसआय
By admin | Published: January 16, 2015 06:12 AM2015-01-16T06:12:03+5:302015-01-16T06:12:03+5:30
राज्यातील शासकीय, सार्वजनिक प्राधिकरण आणि चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संचालित शिक्षण संस्थांना कृषक आणि ना विकास झोनमधील जमिनीवर इमारती
यदु जोशी, मुंबई
राज्यातील शासकीय, सार्वजनिक प्राधिकरण आणि चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संचालित शिक्षण संस्थांना कृषक आणि ना विकास झोनमधील जमिनीवर इमारती उभारण्यासाठी जादा चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे नगरविकास विभागाने प्रस्तावित केले आहे.
नगरविकास विभागाने या निर्णयाबाबतची सूचना जारी केली असून, त्यावर येत्या ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती आणि सूचना मागविल्या आहेत. यामुळे राज्याच्या ग्रामीण भागात शिक्षण संस्थांचे जाळे उभारण्यास मदत होणार आहे. शिक्षण संस्थांना विस्तारासाठी उपलब्ध जमिनीवर जादा एफएसआय मिळेल.
वाढत्या नागरीकरणात शेतजमिनीचा वापर नागरी सोईसुविधांसाठी होत असल्याने शेतजमिनीचे क्षेत्रफळ कमी होत आहे. ते वाचविण्याचाही उद्देश या निर्णयामागे आहे.
वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक
शिक्षण संस्थांना आजवर १२ मीटर ते १५ मीटर रुंदीच्या रस्त्यालगत असलेल्या भूखंडावर ०.२ चटई क्षेत्र बांधकामासाठी दिले जात होते. आता त्यांना ०.३ जादा एफएसआय दिला जाणार आहे. अशा प्रकारे ०.५ इतका एफएसआय मिळेल आणि संबंधित संस्थेला तळमजला अधिक तीन मजले असे बांधकाम करता येईल. १५ मीटर ते १८ मीटर रुंद रस्त्यालगत असलेल्या भूखंडावर सध्या ०.२ एफएसआय आहे. त्यांना जादाचा ०.५ एफएसआय मिळेल. एकूण ०.७ एफएसआयच्या आधारे तळमजला अधिक पाच मजले अशी इमारत संस्थेला उभारता येईल. एकूण १.० एफएसआयच्या आधारे तळमजला अधिक सात मजली इमारत उभारता येईल. फक्त इमारतीची उंची ३० मीटरपेक्षा अधिक असू नये ही अट राहील.