मिरचीचे भरघोस उत्पादन
By admin | Published: July 22, 2016 02:26 AM2016-07-22T02:26:58+5:302016-07-22T02:26:58+5:30
कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग वडगाव घेनंद (ता. खेड) येथील शेतकरी पांडुरंग बुधाजी बवले यांनी करून दाखविला आहे
भानुदास पऱ्हाड,
शेलपिंपळगाव- कष्टाला तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रातदेखील जास्तीत- जास्त उत्पन्न घेता येऊ शकते, असा यशस्वी प्रयोग वडगाव घेनंद (ता. खेड) येथील शेतकरी पांडुरंग बुधाजी बवले यांनी करून दाखविला आहे. त्यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या १२ गुंठे क्षेत्रात मिरची या पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड केली असून, पिकाच्या उत्पादनातून हजारो रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना प्राप्त होत आहे.
दीड महिन्यांच्या कालावधीत मिरचीच्या पहिल्या तीन तोड्यांमध्ये ५० हजार रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळविले असून, पीक समाप्तीपर्यंत बाजारभावात चढउतार जरी झाला, तरीसुद्धा १ लाख रुपयांच्या उत्पन्नाची आशा उत्पादक शेतकरी बाळगून आहे. उच्चांकी बाजारभाव व पिकाच्या उत्पादनापासून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहावयास मिळत आहेत. साधारण दीड महिन्यापूर्वी बारा गुंठ्याच्या मध्यम प्रतीच्या जमिनीत ‘बेड’वर मल्चिंग पेपर आच्छादन करून तीन हजार मिरचीच्या रोपांची लागवड करून ड्रीपद्वारे पाण्याचे नियोजन केले आहे. नियमित आणि आवश्यक तितकेच पाणी दिल्याने रोपांच्या मुळ्या जमिनीत व्यवस्थित स्थिर होऊन पीक जोमात वाढले. दीड महिन्याच्या कालखंडात रोगमुक्त औषधांचा मात्रा पाण्याद्वारे ड्रीपच्याच साह्याने देत राहिल्याने पिकाची रोगराईपासून मुक्ती होण्यास मदत झाली. परिणामी मिरच्यांच्या झाडाला रोगमुक्त फुले येऊन झाडाला फळ आले. सध्या पीक परिपक्व होऊन तोडणीलायक झालेले आहे. मजुरांच्या साह्याने दिवसाआड पिकाची दोनशे ते अडीचशे किलो तोडणी करून चाकण, आळंदी, खडकी येथील बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून, पिकाला बाजारात प्रतिदहा किलोला ११०० ते १३०० रुपये असा उच्चांकी भाव प्राप्त होत असल्याने पीक उत्पादनासाठी केलेल्या कष्टाचे चीज होत आहे. मिरची पिकाच्या संगोपनासाठी १६ हजार रुपयांचा खर्च आला असला तरीसुद्धा पिकापासून अडीच महिन्यांच्या कालखंडात खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे हमखास उत्पन्न प्राप्त होणार आहे.
>‘आम्ही उन्हाळ्याच्या शेवटी-शेवटी कृषिमित्र सतीश गांधिले, संतोष बवले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरचीची लागवड केली होती. चालू वर्षी खरीप हंगामाच्या तोंडावर पावसाने ओढ दिल्याने बहुतांशी भागात शेतीसाठी पाण्याचा तुटवडा निर्माण झाला होता. परिणामी तोडीव पिकांच्या लागवडी उत्पादकांना करता न आल्याने मालाचा तुटवडा निर्माण होऊन बाजारभाव तेजीत राहिले. त्याचा फायदा आम्हाला होत आहे.
- जीवन बवले, शेतकरी