अतिरिक्त शिक्षकांची उपासमार थांबली!
By admin | Published: March 3, 2017 02:15 AM2017-03-03T02:15:53+5:302017-03-03T02:15:53+5:30
अतिरिक्त शिक्षकांच्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या वेतनाला अखेर २ मार्चचा मुहूर्त सापडला आहे.
मुंबई : अतिरिक्त शिक्षकांच्या गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या वेतनाला अखेर २ मार्चचा मुहूर्त सापडला आहे. संबंधित अतिरिक्त शिक्षकांचे वेतन गुरुवारी प्रत्यक्ष खात्यावर जमा झाले आहे. शिक्षक परिषदेने अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर शासनाने तातडीने हा निर्णय घेतल्याचा दावा शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अनिल बोरनारे यांनी केला आहे.
याआधी मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे वेतन डिसेंबर महिन्यापासून बंद केल्याने, तीन महिन्यांपासून शिक्षकांची उपासमार सुरू होती. यासंदर्भात शिक्षण विभागातून वेतनासाठी दिरंगाई होत असल्याचा आरोप करत शिक्षक परिषदेने २२ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला होता. शिवाय शिक्षण उप संचालक, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्तांकडे पाठपुरावाही केला होता. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अखेर अतिरिक्त शिक्षकांसह बोरनारे यांनी नुकतीच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. शिक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत समज देताच प्रशासकीय चक्रे फिरली.
अतिरिक्त शिक्षकांना वेतन देण्याचे लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित केल्याचे बोरनारे यांनी सांगितले. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतरही अतिरिक्त शिक्षकांना वेतन मिळाले नसते, तर शिक्षक परिषदेचे आंदोलन निश्चित होते. मात्र अतिरिक्त शिक्षकांचे नियमित वेतन त्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तरी डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्यांच्या फरकाची रक्कमही तातडीने द्यावी, या मागणीसाठी अधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे बोरनारे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)