अतिरिक्त शिक्षकांना अखेर वेतन मिळणार
By admin | Published: January 9, 2017 05:03 AM2017-01-09T05:03:26+5:302017-01-09T05:03:26+5:30
राज्यातील ४ हजार अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे ज्या नवीन शाळांत समायोजन करण्यात आले असेल
मुंबई : राज्यातील ४ हजार अतिरिक्त शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अखेर सुटला आहे. अतिरिक्त शिक्षकांचे ज्या नवीन शाळांत समायोजन करण्यात आले असेल, त्या शाळांकडे अतिरिक्त शिक्षकांचे वेतन देण्याचे निर्देश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.
संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे नवीन शाळेत समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. काही शाळांनी शिक्षकांचे समायोजन करून घेतले नव्हते, तर काही शाळांनी समायोजन करून घेतले, तरी शिक्षकांचे वेतन नवीन शाळांमध्ये जात नव्हते. त्यामुळे शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. जुन्या शाळेत शिक्षकांचे वेतन पाठवण्यात येत नव्हते आणि नवीन शाळांमध्येही शिक्षकांचे वेतन पाठवण्यात येत नसल्याने शिक्षकांचे नुकसान होत होते. अखेर नवीन शाळेत शिक्षकांचे वेतन दिले पाहिजे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. ३० नोव्हेंबर २०१६ पर्यंत अतिरिक्त शिक्षकांचे शाळेत समायोजन प्रक्रिया पूर्ण होणार होती. त्यामुळे आताही अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या रिक्त पदी समावेश करून त्यांचे वेतन सुरळीत होणे आवश्यक आहे. ज्या शाळेतून अतिरिक्त शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्या शाळेच्या वेतनातून संबंधित शिक्षकाचे नाव काढून टाकून, दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात आले आहे. त्या शाळेच्या वेतन देयकात जोडण्याची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी. ठरलेल्या शिक्षकांच्या वेतनाचे काम थांबवण्याची आवश्यकता नसल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. अतिरिक्त शिक्षकास नवीन शाळेचे मुख्याध्यापक रूजू करून घेत नसल्यास, संबंधित मुख्याध्यापकांची तक्रार करू शकतात. या मुख्याध्यापकांवर आणि शाळेवर कारवाई होऊ शकते. (प्रतिनिधी)