आॅनलाइन खरेदीला उधाण
By admin | Published: October 28, 2016 04:17 AM2016-10-28T04:17:41+5:302016-10-28T04:17:41+5:30
दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्याने आॅनलाइन खरेदीला उधाण आले आहे. वेगवेगळ््या वेबसाइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर
मुंबई : दिवाळीच्या मुहूर्तावर भरघोस सूट जाहीर केल्याने आॅनलाइन खरेदीला उधाण आले आहे. वेगवेगळ््या वेबसाइट्सनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँडेड उत्पादनांच्या खरेदीवर १० ते तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. त्यामुळे ग्राहकही खरेदीसाठी तुटून पडले असून, गॅझेट्स खरेदीला मोठी पसंती आहे.
दिवाळीनिमित्त कपड्यांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी बाजारपेठांत गर्दी उसळली आहे. दुसरीकडे एकाच क्लिकवर विविध ब्रँडच्या वस्तू आॅनलाइन उपलब्ध असल्याने त्याकडे आकर्षित झालेल्या ग्राहकांची संख्या वाढत आहे. दिवाळीआधी १० ते ४० टक्के सूट दिलेल्या आॅनलाइन कंपन्यांनी आत्ता उत्पादनांवर थेट ८५ टक्क्यांपर्यंत सूट दिली आहे. भाऊबीजेला चांगले गिफ्ट म्हणून गॅझेट्सला पसंती आहे. ग्राहकांच्या मागणीमुळे मोबाइल, टॅब व लॅपटॉप घरपोच मिळवण्यासाठी ग्राहकांना पाच ते सात दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. ब्रँडेड कपडे, परफ्युम, शूज, इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मेटिक्स व ब्रँडेड घडाळ््यांनाही मागणी आहे. नामांकित ब्रँडच्या वस्तूंवर ५० टक्क्यांहून अधिक सूट देऊन, तरुणाईला आकर्षित करण्यास आॅनलाइन वेबसाइट्स यशस्वी ठरल्या आहेत. त्याचा फटका किरकोळ दुकानदारांना बसला आहे. (प्रतिनिधी)
सोन्याऐवजी इलेक्ट्रॉनिक वस्तूंना पसंती
गतवर्षीच्या तुलनेत सोन्याचा दर यंदा जास्तच चढा आहे. गेल्या वर्षी २५ हजार ४७१ रुपये प्रति तोळा असलेले सोने, यंदा ३० हजार ३०० रुपयांवर धडकले आहे. मुहूर्ताला सोन्याच्या छोट्या वस्तू खरेदी करणारे ग्राहक फ्रिज, वॉशिंग मशिन आणि टी.व्ही. खरेदी करत आहेत.
सोशल मीडियावर दिवाळीची धूम
सोशल मीडिया, तरुणाई आणि त्यांच्या पोस्ट यामुळे नेहमी चर्चेत राहणारे नेटिझन्स दिवाळीतही आॅनलाइन दिसत आहेत. शहरात वसुबारस मोठ्या प्रमाणावर साजरी होत नसली, तरी नेटिझन्सनी चित्रसंदेश, चारोळी व्हायरल करत धावणाऱ्या मुंबईकरांना दिवाळी आल्याची चाहूल देत शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
दिवाळीसाठी नेटिझन्समध्ये शुभेच्छांसह विशेष पोस्ट, चित्रसंदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत. दहशतवादी हल्ले करणाऱ्या देशाला मदत करणारा चीन, नेटिझन्सच्या ‘ब्लॅक लिस्ट’वर असल्याचे दिवाळी निमित्ताने पाहायला मिळत आहे.
परिणामी, चीनविरोधी पोस्ट व्हॉट्सअॅपवर विविध ग्रुपमध्ये फिरत आहेत. त्याचबरोबर, हॅशटॅग दिवाळी, हॅशटॅग से नो टू चायना असे हॅशटॅग वापरून टिष्ट्वट करण्यासाठी नेटिझन्समध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. विद्युत रोषणाई, रांगोळी यांच्या चित्रसंदेशाने सोशल मीडिया झगमगाटासह सजलेली दिसत आहे. शिवाय, दिवाळीच्या दिवसांचे महत्त्व सांगणारे संदेशदेखील व्हायरल करण्यात नेटिझन्स आघाडीवर आहेत.
आॅनलाइन खरेदीमुळे दिवाळीतील उलाढालीत यंदा ३० टक्क्यांनी घट झाली आहे. ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळत असल्याने, त्यांची पसंती आॅनलाइनला मिळत आहे. मात्र, तोट्यात जाणाऱ्या गुंतवणूकदारांमुळे लवकर आॅनलाइनचे बस्तान गुंडाळले जाईल. त्यामुळे दुकानदारांनी संयम ठेवावा.
- विरेन शाह, अध्यक्ष, फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशन