राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी ; गुरुवारी पुण्यातील तापमान ९.८ अंश सेल्सिअस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 09:05 PM2020-11-12T21:05:13+5:302020-11-12T21:05:38+5:30
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट
पुणे : विदर्भात गेले काही दिवस किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यानंतर आता काहीसा दिलासा मिळाला असतानाच आता पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. गुरुवारी राज्यात सर्वात कमी किमान तापमान पुणे येथे ९.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. ते सरासरीच्या तुलनेत ४.९ अंश सेल्सिअसने घटले आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्यातील सर्वच ठिकाणच्या किमान तापमानात घट झाली आहे. काही ठिकाणी दिवसाच्या तापमानात घट नोंदविली गेली आहे.
राज्यात पुढील दोन दिवस थंडीचा कडाका असणार त्यानंतर मात्र हळूहळू कमी होत जाणार आहे. सोमवारनंतर किमान तापमान सरासरीच्या जवळपास येण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ९.८, लोहगाव १२.२, जळगाव १०.७, कोल्हापूर १६, महाबळेश्वर १३.४, नाशिक १०.४, सांगली १४.१, सोलापूर १५.२, मुंबई २२.८, सांताक्रुझ १९.८, रत्नागिरी १७.५, पणजी १९, डहाणु १८.८, औरंगाबाद १२.८, परभणी १३, नांदेड १५.५, बीड १२.९, अकोला १३.४, अमरावती १४.१, बुलढाणा १४.२, ब्रम्हपुरी१९.६, चंद्रपूर ११.२, गोंदिया १४.५, नागपूर १८.३, वाशिम १४, वर्धा १६.८़
पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आली आहे. गुरुवारी शिवाजीनगर येथे ९़८ अंश या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद झाली़ लोहगाव येथे १२़२ आणि पाषाण येथे ११ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. त्याचवेळी कमाल तापमानातही घट होऊन बुधवारी २९़६ अंश सेल्सिअसची नोंद झाली होती. गुरुवारी त्यात काहीशी वाढ होऊन कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. पुढील दोन दिवस कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३० व ११ अंश सेल्सिअस नोंदविले जाण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.