राज्यात १२ जुलैपर्यंत कोसळधारांचा मारा; कोकण, मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 08:48 AM2022-07-10T08:48:43+5:302022-07-10T08:50:17+5:30
वाचा कोणत्या ठिकाणी कधी आहे रेड आणि ऑरेंज अलर्ट.
ओडिशा आणि लगतच्या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रासह गुजरात तटपासून कर्नाटक तटापर्यंत होत असलेल्या हवामान बदलामुळे १२ जुलैपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईतदेखील येत्या २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत मुंबईचा जोर ओसरला असला तरीदेखील आपत्कालीन घटनांचे सत्र सुरूच आहे. ९ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले असून, ११ ठिकाणी झाडे कोसळली आहेत. एका ठिकाणी इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. यात जीवितहानी झाली नाही.
रेड अलर्ट
१० जुलै रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा
११ जुलै पालघर, रत्नागिरी, रायगड, पुणे आणि सातारा
ऑरेंज अलर्ट
१० ते १३ जुलै
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा
गेल्या २४ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. एक - दोन ठिकाणी अतिवृष्टी झाली. पुढील पाच दिवस हीच स्थिती कायम राहील. ओडिशा आणि आसपासच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. गुजरात तटपासून कर्नाटक तटपर्यंत द्रोणीय क्षेत्र आहे. याच्या प्रभावामुळे पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरात आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
डॉ. जयंता सरकार,
प्रमुख, मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग