महाराष्ट्रासह दक्षिणेच्या राज्यांत मुसळधारेचा इशारा; हवामान खात्याने वर्तविला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 06:00 AM2021-10-04T06:00:27+5:302021-10-04T06:00:53+5:30
केरळमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्यातील पतानमतिथा, कोट्टायम, इडुकी, मलप्पुरम, वायनाड यासह आणखी काही जिल्ह्यांत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी व गोवा तसेच दक्षिण भारतातील तामिळनाडू, केरळ व कर्नाटकच्या किनारपट्टी भागात रविवारपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
केरळमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने राज्यातील पतानमतिथा, कोट्टायम, इडुकी, मलप्पुरम, वायनाड यासह आणखी काही जिल्ह्यांत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी उत्तर केरळमध्ये अनेक ठिकाणी संततधार बरसत होती. त्यामुळे तिथे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती. कासारगोड परिसरात दरडी कोसळण्याचेही प्रकार घडले. महाराष्ट्र व गोव्यामध्ये काही ठिकाणी रविवारपासून बुधवारपर्यंत जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता आहे.
तामिळनाडूच्या दक्षिण भागात कोईंबतूर, सालेम, धर्मपुरी, पेराम्बलूर येथे मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. या राज्याच्या उत्तर भागातील किनारपट्टी प्रदेशातही सोमवारी जोरदार पाऊस होईल. कर्नाटकातील बहुतांश भागात सोमवारी, मंगळवारी संततधार बसरणार आहे. त्याचप्रमाणे बिहार, आसाम, पश्चिम बंगालमधील काही भागांतही संततधार बरसण्याची शक्यता आहे.
ओमानमध्येही इशारा
शाहिन चक्रीवादळ सोमवारी सकाळी ओमानचे आखात ओलांडणार आहे. त्यावेळी दर ताशी ८० ते ९० किमीच्या वेगाने त्या परिसरात वारे वाहतील. त्यामुळे ओमानच्या किनारपट्टी भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.