प्रदेश काँग्रेसकडून तीव्र निषेध
By admin | Published: December 25, 2016 02:57 AM2016-12-25T02:57:50+5:302016-12-25T02:57:50+5:30
सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात लोकशाही पद्धतीने मूक धरणे आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून
मुंबई : सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात लोकशाही पद्धतीने मूक धरणे आंदोलन करू नये म्हणून पोलिसांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून नंतर अटक करण्यात आली, तर मुंबई महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेत्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना लोकशाहीला काळिमा फासणारी घटना असून, याचा तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई काँग्रेसतर्फे मूक धरणे आयोजित केले होते. पंतप्रधान मोदी मुंबईत असल्याने सरकारविरोधातील आंदोलन दडपण्यासाठी निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून नंतर अटक करण्यात आली. हे कृत्य भाजपा सरकार फॅसिस्ट असल्याचे सिद्ध करणारे आहे, असेही चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे आजही देश बँका आणि एटीएमच्या रांगेत असताना त्याविरोधात आवाज उठवणे हा विरोधी पक्षांना लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. पण भाजपा सरकार लोकशाही मानत नसल्याने आंदोलन करणाऱ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवणे, अटक करून विरोधकांचा आवाज दाबणे ही हुकूमशाही असल्याचेही चव्हाण म्हणाले. भाजपाचे सरकार आल्यापासून सातत्याने विरोधी पक्षांचा आणि सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर काही गंभीर आरोप केले आहेत. पंतप्रधानांनी या आरोपावर स्पष्टीकरण देण्याची मागणी निरुपम यांनी केली होती त्यामुळेच निरुपम यांना दिवसभर नजरकैदेत ठेवून नंतर अटक करून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला गेला, असेही चव्हाण म्हणाले. (प्रतिनिधी)
मच्छीमारांची धरपकड
शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला विरोध करत निदर्शने करण्याच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्यासह दीडशेहून १९३ कार्यकर्त्यांना कफपरेड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यानंतर शनिवारी सायंकाळी ७ वाजता त्यांना सोडण्यात आले, अशी माहिती कफपरेड पोलिसांनी दिली.