Rain Updates: मध्य महाराष्ट्र, कोकण पट्ट्यात अती मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 03:10 PM2021-09-11T15:10:08+5:302021-09-11T15:10:54+5:30
Extremely Heavy Rain Warning to Maharashtra: गणेशोत्सवात बाहेर पडत असाल तर सावधान. हवामाना खात्याने महाराष्ट्रासह गोव्याला इशारा दिला आहे.
बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण पट्ट्यात, गोवा, मध्य महाराष्ट्रात, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ ओडीशा आदी भागात पुढील पाच दिवस तीव्र ते अति तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. (Isolated extremely heavy falls also likely over Odisha, Gujarat state and Madhya Maharashtra on 13th and Konkan & Goa during 13th-14th September.)
Delhi Rain: हा दिल्ली विमानतळ आहे की समुद्र? मुसळधार पावसामुळे सगळीकडे पाणी तुंबले
तसेच मध्य महाराष्ट्राला १३ सप्टेंबर आणि कोकण, गोव्यामध्ये १३-१४ सप्टेंबरला अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरावर सायक्लॉन सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हे वादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत आहे. यामुळे ओडीशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रकिनारी पुढील ४८ तासांत हे वारे आदळणार असून ते पुढे पुढील तीन दिवसांत ओडीशावरून छत्तीसगढकडे जातील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दिल्लीत पावसाचा थैमान सुरु
देशाची राजधानी दिल्लीमध्ये रात्रभरापासून मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या दशकभरापासूनचा हा सर्वाधिक पाऊस आहे. यामुळे दिल्लीत ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचू लागले असून विमानतळावरदेखील रनवेसह परिसर जलमय झाला आहे. येथील पाणी पाहून हा दिल्लीचा विमानतळ आहे यावर विश्वास बसत नाहीय. दिल्लीला येणारी विमाने दुसरीकडे वळविण्यात आली आहेत. हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या 24 तासांत दिल्लीत 97 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पुढे आणखी काही तास पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे दिल्लीच्या आयजीआय एअरपोर्टच्या टर्मिनल 3 मध्ये पाणी घुसले आहे. यामुळे लोकांना त्रास होत आहे. विमानतळावर टॅक्सीतून येणाऱ्या प्रवाशांना आत जाण्यासाठी पाण्यातून वाट काढत जावे लागत होते. अनेक लोक पावसामुळे विमानतळावरच थांबले आहेत. रनवेच्या आजुबाजुला पाणी भरले आहे.