लक्ष-लक्ष हातांनी बरसल्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 04:29 AM2017-01-14T04:29:05+5:302017-01-14T04:29:05+5:30

सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धरामेश्वर महायात्रेत

Eye-catching attention | लक्ष-लक्ष हातांनी बरसल्या अक्षता

लक्ष-लक्ष हातांनी बरसल्या अक्षता

googlenewsNext

सोलापूर : सोलापूरसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमावर्ती भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धरामेश्वर महायात्रेत दुसऱ्या दिवशीचा अक्षता सोहळा शुक्रवारी भक्तिमय उत्साहात पार पडला़ पांढऱ्या शुभ्र बाराबंदी पोशाखातील भक्तांमुळे जणू भक्तिसागराला भरती आल्याचे चित्र सिद्धरामेश्वर तलाव परिसरात दिसून आले़ ‘संमती’च्या (मंगलाष्टका) ‘दिड्डम् दिड्डम्, सत्यम् सत्यम्’ गजरासोबतच भाविकांनी लक्ष-लक्ष हातांनी आपल्या आराध्य देवतेवर अक्षतांची बरसात केली़
शुक्रवारी सकाळी ८ वाजता बाळीवेस येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू वाड्यातील धार्मिक विधीनंतर सातही नंदीध्वजांची पूजा करण्यात आली. हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वज मिरवणुकीने अक्षता सोहळ्यासाठी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्याकडे मार्गस्थ झाले. या मार्गावर ठिकठिकाणी नंदीध्वजांना खोबऱ्याचे हार, बाशिंग बांधण्यासाठी भाविक थांबले होते़ दुपारी २च्या सुमारास सातही नंदीध्वज संमती कट्ट्यावर दाखल झाले. सोहळ्यातील सुगडीपूजन आणि गंगापूजन हे दोन प्रमुख विधी पार पडल्यानंतर पंरपरेप्रमाणे सुहास शेटे यांनी संमती वाचन केले. त्यांच्या मुखातून ‘दिड्डम् दिड्डम् - सत्यम् सत्यम्’ उच्चार होताच सारा आसमंत ‘सिद्धेश्वर महाराज की जय’च्या जयघोषांनी दुमदुमून गेला़
अक्षता सोहळा पार पडल्यावर सातही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. तेथील विधीनंतर नंदीध्वज मिरवणुकीने ६८ लिंगांच्या दर्शनासाठी रवाना झाले. रात्री उशिरा हे सातही नंदीध्वज श्री मल्लिकार्जुन मंदिरात दाखल झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Eye-catching attention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.