दहावी-बारावी परीक्षा ‘सीसीटीव्ही’च्या नजरेत
By admin | Published: February 15, 2015 10:50 PM2015-02-15T22:50:08+5:302015-02-15T23:51:14+5:30
कोल्हापूर जिल्हा : मुरगूड येथे पहिलाच उपक्रम
अनिल पाटील- मुरगूड -- कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या काळ्या यादीत असणाऱ्या मुरगूड (ता. कागल) येथील परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या केंद्रावरील कॉपीच्या समूळ उच्चाटनासाठी यावर्षी इमारतीच्या बाहेर व आत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. कॉपीमुक्तीसाठी अत्याधुनिक साधनांचा परीक्षा केंद्रावर वापर केला जाण्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला उपक्रम होय.
गेल्या दोन वर्षांपासून कॉपीचे उच्चाटन करून हे परीक्षा केंद्र आदर्शवत करण्यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांना यश आले आहे.
विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवीन वळण देणारी परीक्षा म्हणून दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेकडे पाहिले जाते. या परीक्षेत काही विद्यार्थी गुण मिळविण्यासाठी गैरमार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. याला मुरगूड केंद्रावरील विद्यार्थी अपवाद नाहीत. बोर्डाने ज्या केंद्रावर कॉपी मोठ्या प्रमाणावर चालते अशा कुप्रसिद्ध केंद्राची काळी यादी तयार केली आहे. या यादीत मुरगूडचे नाव वरच्या क्रमांकावर होते. कॉपीला विरोध करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापकांना शिवीगाळ, मारहाण करणे, त्यांच्या घरांवर हल्ला करण्यापर्यंत विद्यार्थी-पालकांची मजल गेली होती. त्यामुळे जाणकार पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमधून कॉपीचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न सुरू झाला.
दोन वर्षांपासून केंद्र संचालकांची जबाबदारी घेऊन प्राचार्य महादेव कानकेकर यांनी कॉपी उच्चाटनासाठी प्रयत्न केले. पहिल्या वर्षी शहरातील प्रमुख मंडळींची समिती तयार करून केंद्राबाहेर बैठक व्यवस्था केल्याने बाहेरून होणारा त्रास मोठ्या प्रमाणात कमी झाला. मागील वर्षी सर्व शिक्षक, शिपाई यांना कडक सूचना देऊन व सर्वच पेपरना भरारी पथक उपस्थित ठेवून ९० टक्के कॉपीचे उच्चाटन केले, पण विद्यार्थी कॉपीचा वापर करत असतील तर त्याला रंगेहात पकडण्यासाठी काळजी घेतली आहे.
अंदाजे दोन लाख रुपये खर्च करून प्राचार्य कानकेकर यांनी परीक्षा केंद्राच्या बाहेरील बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे बाहेरील बाजूने कोण कॉपी देण्याचा प्रयत्न केला, तर फुटेजद्वारे पोलीस त्यांच्यावर कडक कारवाई करणार आहेत. मैदानासह व्हरांडा, परीक्षा हॉलमध्ये सुद्धा कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहे.
बारावीसाठी अंदाजे १२०० विद्यार्थी, तर दहावीसाठी ७०० विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सहभागी सर्व शाळांचे मुख्याध्यापक व पोलीस यांची एकत्रित बैठक घेतली असून, पोलिसांनीही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागणार नाही. निर्भयपणे विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे.
- महादेव कानकेकर, प्राचार्य, शिवराज महाविद्यालय, मुरगूड