दक्षिण मुंबई कॅमेऱ्यांच्या नजरेत
By admin | Published: December 1, 2015 01:28 AM2015-12-01T01:28:27+5:302015-12-01T01:28:27+5:30
दक्षिण मुंबईतील अति महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या १३८१ सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाला.
मुंबई : दक्षिण मुंबईतील अति महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणाऱ्या १३८१ सीसीटीव्ही यंत्रणेच्या पहिल्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी झाला. मुंबई स्मार्ट सिटीबरोबरच सेफ सिटी बनविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १२०० कॅमेरे लावण्याचे उद्दिष्ट असताना आज दक्षिण मुंबईत १२८१ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मुंबई उच्च न्यायालय, गिरगाव चौपाटी आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे मागणीनुसार कॅमेरे वाढविण्यात आले असून, हा प्रकल्प पूर्ण होण्याची मुदत आॅक्टोबर २०१६ असली तरी पावसाळ्यापूर्वीच हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मनोदय गृह विभागाचे अपर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले, २६ नोव्हेंबर २०१६पूर्वी संपूर्ण मुंबई शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली येणार असून, सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली येणारे मुंबई हे जगातील पहिले मोठे शहर असेल. कमांड आणि कंट्रोल सिस्टीमच्या माध्यमातून मुंबईला सुरक्षित शहर बनविण्यास प्राधान्य देऊ. लवकरच राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सीसीटीव्हीचे भक्कम नेटवर्क उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या समारंभाला उद्योग मंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) प्रा. राम शिंदे, महापौर स्नेहल अांबेकर, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पोलीस आयुक्त जावेद अहमद उपस्थित होते. या वेळी एल एल अॅण्ड टी कंपनीचे आर. श्रीनिवासन आणि सीसीटीव्हीची ठिकाणे निश्चित करण्यासाठी मदत केल्याबद्दल माजी पोलीस सह आयुक्त वसंत ढोबळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (विशेष प्रतिनिधी)
सीसीटीव्ही प्रकल्पाची वैशिष्ट्ये
संपूर्ण मुंबई शहरात १५१० ठिकाणी जागतिक दर्जाचे व उच्च क्षमता असलेले सुमारे ६०२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार. यामध्ये ११५० पीटीझेड कॅमेरे, २० थर्मेल कॅमेरे तर ४८५० फिक्स बॉक्स कॅमेरे असतील. पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील कुलाबा ते वरळीदरम्यानच्या संवेदनशील व महत्त्वाच्या ४३४ ठिकाणी सुमारे १३८१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय, मुंबई, वाहतूक मुख्यालय, वरळी आणि नवी मुंबई येथे असेल. दुसऱ्या टप्प्यात उत्तर व पूर्व मुंबईत कॅमेरे बसविणार.