राज ठाकरे अन् मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर ऑन कॅमेरा संवाद; बैठकीत काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 10:51 PM2024-08-05T22:51:56+5:302024-08-05T22:53:59+5:30
धाराशिव इथं मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले. त्यानंतर राज ठाकरेंनी या आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे.
धाराशिव - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून धाराशिव इथं आज ते पोहचताच मराठा आंदोलकांनी त्यांना घेरलं. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबलेत तिथे मराठा आंदोलक घुसले. त्यांनी राज यांना आरक्षणावर भूमिका मांडण्याची मागणी केली. यावेळी राज ठाकरेंना भेटता न आल्यानं आंदोलकांनी तिथेच ठिय्या आंदोलन केले. यावेळी राज ठाकरेंविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर यातील मराठा कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरेंची ऑन कॅमेरा चर्चा झाली. यावेळी राज ठाकरेंनी राजकीय पक्ष तुमच्या आंदोलनाचा वापर करून घेतायेत हे रोखठोक मत त्यांच्यासमोर मांडले.
राज ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा मी तिथं आलो, तिथं सांगितले, तुम्ही जी मागणी करताय ते हे लोक होऊ देणार नाहीत. तुमची माथी भडकवणे, संघर्ष घडवणे, यातून मते मिळवणे त्यामुळे तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल, हेच ते करत आहेत. उद्या जर हे राज्य माझ्या हाती आले तर महाराष्ट्रात कुणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही. आपली मराठी मुले, मराठी मुली, आपला शेतकरी यांच्यावर जो पैसा खर्च व्हायला पाहिजे तो नको त्या लोकांवर महाराष्ट्रात पैसा खर्च होतोय असं त्यांनी मराठा आंदोलकांना सांगितले.
तसेच जे पूल बांधले जातायेत, कोणासाठी, लोकसंख्या का वाढतेय? जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत, महाराष्ट्रावर खर्च व्हायला हवेत ते फक्त ४ शहरांवर खर्च केले जातायेत. हजारो कोटी टेंडर काढली जातात. सगळा पैसा शहरांवर जातोय. लोकसंख्या वाढीमुळे सर्वात जास्त पैसा शहरांवर खर्च होतो. जो शेतकऱ्यांवर, इथल्या शिक्षणावर व्हायला पाहिजे. आज इतक्या आस्थापना आहेत. तिथे मराठी लोकांना घेणार नाहीत असं सांगितले जाते. या लोकांची इथपर्यंत मजल होते. आपल्याकडील कंपन्या, तुमच्यापर्यंत नोकऱ्या कुठे आहेत हे पोहचलं जात नाही. हा प्रश्न सोपा आहे. आपल्याकडे किती नोकऱ्या, शिक्षणाच्या संधी हे आपल्या मुलांना माहितीच नाही. त्यांच्यापर्यंत पोहचवलं जात नाही. रेल्वेच्या नोकऱ्या महाराष्ट्रात, जाहिराती यूपी बिहारमध्ये. त्यांना तुमच्या नोकऱ्या कळतायेत पण तुम्हाला नाही असंही राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना सांगितले.
दरम्यान, मी जे आज बोलतोय ते तुम्हाला आज कळणार नाही. अजून काळ जाऊ दे. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टींचा अंदाज येईल. जरांगे पाटील त्यांनाही या गोष्टीचा अंदाज येईल. नेते या आंदोलनातून साधून घेतायेत ते समजून घ्या. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, इथल्या मराठी मुलामुलींना शिक्षण, रोजगार यासारखी संधीच इतर ठिकाणी उपलब्ध नाही. आतापर्यंत तुम्हाला किती जणांनी आश्वासने दिली? फडणवीस मुख्यमंत्री असताना इतके मोर्चे निघाले काय झालं पुढे?. तुमच्या तोंडाला पानं पुसली जातायेत आणि हे लोक त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत या लोकांपासून सावध राहा असं आवाहन राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांना केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये समोरासमोर चर्चा, राज ठाकरेंशी संवादानंतर आंदोलन स्थगित #RajThackeray#MarathaReservationpic.twitter.com/aW9CNP87zx
— Lokmat (@lokmat) August 5, 2024
आम्ही राजकारणात उतरणार - मराठा आंदोलक
या भेटीनंतर मराठा आंदोलक म्हणाले की, काही पक्ष तुमच्या आंदोलनाचा वापर करतायेत. लोकसभेला तुमच्या विचारांचा फायदा त्यांनी घेतला म्हणून हे लोक तुमची माथी भडकवायेत असं म्हटलं. मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टला त्यांची भूमिका मांडणार आहे. जर आमच्या आंदोलनाचा राजकीय पक्षांना फायदा होत असेल तर आम्ही राजकारणात का उतरू नये. म्हणून आम्हीपण राजकारणात यायचा निर्णय घेतला आहे असं आम्ही राज ठाकरेंना सांगितले.
त्याशिवाय तुमची मराठा आरक्षण यावर भूमिका काय असा प्रश्न आम्ही राज ठाकरेंना विचारला. त्यावर मी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतो. त्यांच्यात आणि माझ्यात जी काही चर्चा होईल, त्यांच्या भेटीत माझी भूमिका काय असेल हे मी परवा तुम्हाला स्पष्ट करून सांगतो असं राज ठाकरेंनी आंदोलकांना सांगितले. परवा दिवशीची भूमिका मराठा आरक्षणाच्या बाजूने असेल, मनसेची सकारात्मक भूमिका असेल तर आमचं त्यांचे जमेल. अन्यथा प्रत्येक मराठवाडा दौऱ्यात त्यांना जाब विचारला जाईल. तूर्तास आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत अशी भूमिका मराठा आंदोलकांनी घेतली.
मराठा आंदोलकांमध्ये शरद पवारांचे कार्यकर्ते?
राज ठाकरेंविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा कार्यकर्त्यांमध्ये मविआचे उद्धव ठाकरे गट, शरद पवारांचे कार्यकर्ते असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी व्हायरल होणाऱ्या फोटोतील कार्यकर्त्याला पत्रकाराने प्रश्न विचारला असता मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही. मी १२-१३ वर्ष झालं समाजासाठी काम करतो. असे फोटो व्हायरल करत असतात. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी असे अनेक आरोप मनोज जरांगेंवर झाले, आमच्यावरही करत आहेत. त्यांना आमच्या कामातून उत्तर मिळेल. मी २०१३ मध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता होतो. मात्र त्यानंतर माझा आणि त्यांचा कुठलाही संबंध नाही असं त्या कार्यकर्त्याने सांगितले.