आमने-सामने : खरा दसरा मेळावा नेमका कुणाचा?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 10:28 AM2022-09-25T10:28:43+5:302022-09-25T10:29:13+5:30

खरा दसरा मेळावा नेमका कुणाचा, असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

Face to face Whose is the real Dasara melava shiv sena uddhav thackeray eknath shinde shivaji park bkc balasaheb thackeray | आमने-सामने : खरा दसरा मेळावा नेमका कुणाचा?

आमने-सामने : खरा दसरा मेळावा नेमका कुणाचा?

Next

दसरा मेळावा ही शिवसेनेची पारंपरिक संस्कृती आहे. आम्ही हा सोहळा म्हणून साजरा करतो, राजकीय व्यासपीठ म्हणून नाही. याची सुरुवात बाळासाहेबांनी केली आहे. मी ४० वर्षे शिवसेनेच्या प्रवाहात पदाधिकारी म्हणून आहे. आतापर्यंत मी पाहिले आहे की सेना भवनवरून दसरा मेळाव्याचे नियंत्रण दिले जाते. मग सेना भवन काय यांच्या ताब्यात आहे का? आजही सेना भवनवर शिवसेनेचे प्रभुत्व आहे. उद्धव ठाकरे सेना भवन चालवतात. आम्ही आमदार म्हणून शिवसेनेच्या निशाणीवर निवडून आलो आहोत, आमदारांनी शिवसेना निवडून आणलेली नाही. त्यामुळे आमदार, खासदार कोणाबरोबर आहेत म्हणजे त्यांच्यासोबत पक्ष आहे, असे होत नाही. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. आमच्याबरोबर असताना ज्यांना तोंडही उघडता येत नव्हते, ते आता फार बोलू लागले आहेत. कारण त्यांचे प्रबोधन दिल्लीवरून होते. सामान्य शिवसैनिक आमच्याबरोबरच आहे. दसऱ्या मेळाव्याची नुसती परवानगी मिळाली, तेव्हा शिवसैनिकांनी जल्लोष केला, तो जल्लोष कसला होता? बाळासाहेबांनी दसरा मेळावा सुरू केला, बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरेंनी ही परंपरा सुरू ठेवली. कुठल्या दसरा मेळाव्यात आतापर्यंत एकनाथ शिंदे बोलले आहेत?

दसरा मेळाव्याला शिवसैनिक विचारांचे सोने लुटतात. दरवेळी दसरा मेळाव्यानंतर नवा विचार घेऊन महाराष्ट्रभर जातात. लोकांचे प्रश्न सोडवितात. शिवसेनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचवतात. छोटे गाव, वाडी-वस्तीवरून शिवसैनिक मुंबईत येतात. त्यांच्यात प्रचंड उत्साह संचारलेला असतो. दसरा मेळावा म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारचे टॉनिकच असते. शिवसेनाप्रमुखांपासून ही समृद्ध परंपरा शिवसेनेला लाभली आहे. कितीही आले, गेले तरी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा खंडित झालेली नाही, होणारही नाही.
अजय चौधरी, शिवसेना गटनेते, विधानसभा

हा दसरा मेळावा आम्ही आमचा मानतो आहे. कारण दसरा मेळाव्याची सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्यांचे विचारच ज्यांना पटत नव्हते, ते सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्या पायाशी जाऊन बसले. ज्यांच्यावर आयुष्यभर बाळासाहेबांनी टीका केली. त्यांचे हिंदुत्वाचे विचार असतील, मराठी माणसाचे विचार असतील, हे सगळे त्यांनी सोडले म्हणून हा गट बाहेर पडला. एका पक्षातील ४० आमदार बाहेर पडणे ही देशातील सगळ्यात मोठी घटना होती. त्यामुळे हा मेळावा आमचा आहे. तुम्हाला बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जायचे नसतील तर केवळ ‘शो’ म्हणून तुम्ही दसरा मेळावा का करताय? परंपरा आहे म्हणून गणपती घरी आणायचा, असा तुम्हाला सण साजरा करायचा आहे का? तुम्हाला बाळासाहेबांचे विचार नको असतील तरी आम्हाला त्या प्रथा- परंपरा कायम ठेवायच्या आहेत. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर यांनी बाळासाहेबांचा ‘हिंदुहृदयसम्राट’ असा उल्लेख करणे बंद केले होते. वंदनीय, असा ते उल्लेख करायचे. आता सरकार गेल्यानंतर हिंदुहृदयसम्राट म्हणायला सुरुवात केली.

सोनिया गांधींनी आडकाठी केली होती का? उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू ठेवली होती, म्हणजे वडील जे करतात ते त्यांनी सुरू ठेवले; पण तो एक दिखावा होता. जर परंपरा होती आणि ती मनापासून होती, तर बाळासाहेब ज्या काँग्रेसला शिव्या घालत होते त्यांच्या मांडीला मांडी लावून का बसलात? नवाब मलिकांच्या मांडीला मांडी लावून अडीच वर्षे सरकार चालवले. ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अटक करण्याचे प्रयत्न केले, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही शपथ घेतली. तेव्हा कुठे गेली होती परंपरा. यांनी सर्व परंपरा आणि विचारांना तिलांजली वाहिलेली आहे. एकनाथ शिंदे खऱ्या अर्थाने त्या प्रथा, परंपरा पुढे नेण्याचे काम करत आहेत.
किरण पावसकर,
प्रवक्ते, शिंदे गट

शब्दांकन - दीपक भातुसे

Web Title: Face to face Whose is the real Dasara melava shiv sena uddhav thackeray eknath shinde shivaji park bkc balasaheb thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.