फेसबुक अकाउंटची चौकशी
By admin | Published: February 13, 2016 01:57 AM2016-02-13T01:57:34+5:302016-02-13T01:57:34+5:30
गुरगाव पोलिसांकडून ७ फेब्रुवारी रोजी चकमकीत ठार झालेला गुंड संदीप गडोली याच्यासोबत असलेल्या पूजा पहुजा हिने ती ५ फेब्रुवारीपासून कोठे-कोठे होती याचा तपशील फेसबुकवर टाकला होता.
- डिप्पी वांकाणी, मुंबई
गुरगाव पोलिसांकडून ७ फेब्रुवारी रोजी चकमकीत ठार झालेला गुंड संदीप गडोली याच्यासोबत असलेल्या पूजा पहुजा हिने ती ५ फेब्रुवारीपासून कोठे-कोठे होती याचा तपशील फेसबुकवर टाकला होता. संदीप गडोली हा येथील हॉटेल एअरपोर्ट मिडटाऊनमध्ये थांबला असताना त्याच्या खोलीत पूजा पहुजाही होती. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा सध्या पूजा पहुजा ही गुरगाव पोलिसांची खबरी म्हणून काम करीत होती का यासाठी फेसबुक अकाउंटची चौकशी करीत आहेत.
बॅलिस्टीक टेस्टसाठी पोलिसांकडून अनेक वस्तू आमच्याकडे आल्या आहेत त्यामुळे प्रत्यक्ष अहवाल तयार व्हायला १० दिवस तरी लागतील, असे न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या (एफएसएल) अधिकाऱ्यांनी सांगितले. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी
७ वाजून ९ मिनिटांनी पूजाने ती कोठे (जयपूरमधील जालुपुरा न्यू कॉलनीत) आहे याची माहिती फेसबुकवर दिली. त्यासोबतच्या स्टेटसमध्ये तिने ‘जयपूरमध्ये भीती वाटत आहे’ असे म्हटले होते. दुसऱ्या दिवशी दुपारी ४.४८ वाजता पहुजाने फेसबुकवर राष्ट्रीय महामार्गावरील फलकाचे चित्र टाकले होते. त्यात ती सुरतमध्ये व मुंबईपासून २९६ किलोमीटरवर असल्याचे दाखवत होती. त्याच दिवशी (६ फेब्रुवारी) अंधेरीतील लीला हॉटेलमध्ये आल्याचे तिने फेसबुकवर टाकले होते. पहुजाने तिच्यासोबत मुंबईला आलेल्या दोन विदेशींसोबत काढलेली सेल्फीही फेसबुकवर टाकली होती.
संदीप गडोली ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झाला होता. ‘‘आम्ही तिच्या सोशल मीडिया अकाउंट्सची चौकशी करीत आहोत आणि तिची या घटनेत काही भूमिका होती का हे तपासून बघत आहोत; याशिवाय आम्ही तिचे दंडाधिकाऱ्यांसमोर निवेदनही नोंदवून घेतले आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
गुरगावच्या पथकाने दावा केल्याप्रमाणे ते कोणाकोणाच्या संपर्कात होते, याचीही आम्ही पडताळणी करीत आहोत.
या सर्व बाबींची तपासणी करून आम्हाला आमचा अहवाल सादर करण्यास किमान १0 दिवस लागतील, असेही हा अधिकारी म्हणाला. ही सर्व सामग्री पोलिसांकडून गुरुवारी मिळाली. १५ ते १८ फेब्रुवारीदरम्यान आमचे अधिकारी प्रशासकीय प्रशिक्षणासाठी पुण्याला जात आहेत. ते परत आल्यानंतरच हे प्रकरण हाताळतील, असेही हा अधिकारी म्हणाला.
अहवाल सादर करायला दहा दिवस लागतील
न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळ्या झाडलेल्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या हाताला चिकटून राहिलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या पावडरचे नमुने (हॅण्डवॉश), मोबाइल फोन्स आणि गुन्हा घडलेल्या ठिकाणी पडलेल्या गोळ्या आम्हाला मिळाल्या आहेत.
याशिवाय हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फूटेज, हॉटेल रूममधील रक्ताचे नमुने, वाळूही आम्ही ताब्यात घेतली आहे.
गुरगावच्या पथकाने दावा केल्याप्रमाणे त्यांनी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता का, याचा आम्ही तपास करीत आहोत
‘हॅण्डवॉश’वरून गोळ्या किती अंतरावरून झाडण्यात आल्या आणि अन्य तत्सम बाबीही स्पष्ट होतील. या पथकाचे सीसीटीव्हीचे फूटेजही आमच्याकडे आहे. या सर्व बाबींची तपासणी करून आम्हाला आमचा अहवाल सादर करण्यास किमान १0 दिवस लागतील.