फेसबुक मित्राने लग्नाचे आमीष दाखवून केला बलात्कार
By admin | Published: October 27, 2016 10:41 AM2016-10-27T10:41:36+5:302016-10-27T11:10:11+5:30
लग्नाचे आमीष दाखवून 17 वर्षांच्या मुलीवर 21 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - लग्नाचे आमीष दाखवून 17 वर्षांच्या मुलीवर 21 वर्षांच्या तरुणाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुळची ठाण्यातील रहिवासी असलेल्या या मुलीची फेसबुकच्या माध्यमातून संबंधित तरुणासोबत ओळख झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाने पीडितेला लग्नाचे आमीष दाखवले. तसेच ती गरोदर राहिल्याचे समजल्यानंतर गर्भपात करण्यासाठीदेखील तिच्यावर जबरजस्ती केली.
भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीवर बलात्कार करणार तरुण हा धायरी येथील राहणारा असून तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. या मुलीसोबत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर, त्यांचे ऑनलाइन बोलणे वाढले. याचदरम्यान, त्याने मुलीला लग्नाचे आमीष दाखवले आणि भेटण्यासाठी तिला पुण्यामध्ये यायला सांगितले.
ही मुलगी पुण्यामध्ये पोहोचल्यानंतर तिला कात्रजमधील एका ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ऑगस्टमध्ये गरोदर राहिल्याचे जेव्हा पीडित मुलीने या तरुणाला सांगितले, तेव्हा त्याने तिला गर्भपात करायला सांगितले. शिवाय तो तिला टाळूदेखील लागला. यातून काहीतरी मार्ग निघावा यासाठी तिने पुण्यात येऊन त्याच्या पालकांशी, अन्य नातेवाईकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांनीही तिची बाजू जाणून-समजून न घेता झाल्या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. यानंतर अखेर मुलीने झालेल्या प्रकाराबाबत मंगळवारी तक्रार दाखल केली, अशी माहिती पोलीस अधिका-यांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.