फेसबुकचे बनावट खाते चालवणारा अटकेत
By admin | Published: May 23, 2017 02:06 AM2017-05-23T02:06:08+5:302017-05-23T02:06:08+5:30
वर्गमैत्रिणीच्या नावाचे बनावट फेसबुक खाते सुरू करून त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वर्गमैत्रिणीच्या नावाचे बनावट फेसबुक खाते सुरू करून त्यामध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्याला नेरुळ पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या नावाचा व फोटोचा परस्पर वापर झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने तक्रार दिली होती. यानुसार जुईनगर येथून त्याला अटक करण्यात आली आहे.
प्रणव ढवळे (१८) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. जो ज्या महाविद्यालयात शिकतो, त्याच महाविद्यालयातल्या एका मुलीच्या नावाचे त्याने बनावट फेसबुक खाते उघडले होते. याद्वारे त्याने अनेकांना फ्रेन्ड्स लिस्टमध्ये समाविष्ट करून घेतले होते. याकरिता त्याने त्या मुलीच्या परस्पर तिचे फोटो फेसबुकवर वापरले होते. काही दिवसांपासून तो त्या मुलीच्या फोटोसोबत अश्लील मेसेज शेअर करत होता. यामुळे सदर मुलगीच फेसबुकवर अश्लील वर्तन करत आहे, असा गैरसमज अनेकांमध्ये निर्माण झाला होता.
त्यापैकी काहींनी सदर मुलीकडे खात्री केली असता, ते फेसबुक अकाऊंट बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार सदर तरुणीने आपल्या नावाचा व फोटोचा गैरवापर होत असल्याची तक्रार नेरुळ पोलिसांकडे केली होती. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगुजी औटी यांनी तपासाला सुरवात केली होती. यावेळी पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करून छडा लावला.