आॅनलाइन व्हिसाची १५० देशांसाठी सोय
By Admin | Published: August 28, 2016 12:45 AM2016-08-28T00:45:35+5:302016-08-28T00:45:35+5:30
भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना
पुणे : भारतीय परराष्ट्र विभागातर्फे जगातील १५० देशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची (आॅनलाइन व्हिसा) सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यामुळे भारतात अल्प काळासाठी येणाऱ्या नागरिकांना (पर्यटन व इतर) आता कोणताही निर्बंध नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मुळे यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. मुळे म्हणाले, ‘‘मागील पाच वर्षात पासपोर्ट आणि व्हिसा पॉलिसीत आमूलाग्र बदल झाला आहे. इलेक्ट्रॉनिक व्हिसामुळे जगातील १५० देशांतील नागरिकांना घरबसल्या व्हिसा उपलब्ध होणार आहे. तर दुसरीकडे देशात मागील वर्र्षी पासपोर्टसाठी दोन कोटी नागरिकांचे अर्ज दाखल झाले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज येत असले तरी अद्यापही देशातील दहा टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट आहे. देशामध्ये पासपोर्ट विभागाची १०० कार्यालये आहेत. या माध्यमातून ते जास्तीत जास्त एक ते दीड कोटी प्रकरणेच हाताळू शकतात. यामुळे देशात कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पासपोर्ट उपलब्ध झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सौदी अरेबीयातील नोकरी गमावलेल्या भारतीयांना भारतात आणण्याचे काम दररोज करण्यात येत आहे. हे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून भारत सरकारने याबाबत जागतिक पातळीवर अतुलनीय कामगिरी केली आहे. या नागरिकांना परतीचे तिकीट मिळेपर्यंत तेथील सरकारने निवास व भोजनाची सोयही उपलब्ध केली आहे. कोणताही भारतीय नागरिक विदेशात विपण्ण अवस्थेत राहणार नाही याची काळजी भारत सरकारने घेतली असल्याचे मुळे यांनी स्पष्ट केले.
राजकारण्यांना परदेश व्यापारनीतीचे ज्ञान आवश्यक असेल तरच दोन देशांच्या संबंधात सुधारणा होते. हे संबंध फक्त पंतप्रधान व परराष्ट्र मंत्र्यांपुरतेच मर्यादित नकोत. स्थानिक आमदार, महापौर यांच्यामध्येही तसेच संबंध राखले पाहिजे. हे राज्यकर्ते दुसऱ्या देशांचा प्रवास करत नाहीत तो पर्यंत ते जनतेला संबंधित देशाबद्दल चांगले सांगू शकत नाहीत. यामुळे भारतानेही या दृष्टीकोनातून वाटचाल करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे मुळे म्हणाले.
पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे, पत्रकार संघाचे अध्यक्ष गजेंद्र बडे, सरचिटणीस अजय कांबळे यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)