सोयी बनल्या समस्या
By admin | Published: November 11, 2014 12:57 AM2014-11-11T00:57:45+5:302014-11-11T00:57:45+5:30
नागरिकांच्या सोयींसाठी शहरात १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सुरुवातही झाली, परंतु तीन वर्षांनंतरही याचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही.
अर्धवट सिमेंट रस्ते धोकादायक : मनपाची कंत्राटदारावर मेहेरनजर
राजीव सिंह- नागपूर
नागरिकांच्या सोयींसाठी शहरात १०० कोटी रुपयांचे सिमेंट रस्ते बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामाला सुरुवातही झाली, परंतु तीन वर्षांनंतरही याचे दहा टक्केही काम पूर्ण झालेले नाही. सध्या अर्धवट सिमेंटचे हे रस्ते वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहेत. माजी महापौर अर्चना डेहनकर यांच्या कार्यकाळात सध्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत केडीके कॉलेज ते घाट रोड मार्गावर सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन झाले. त्यावेळी या सिमेंट रस्त्याला १०० ते १५० वर्षांपर्यंत काहीच होणार नाही, अशी घोषणाही करण्यात आली. परंतु सध्याच्या स्थितीत अर्धवट झालेला रस्ता अनेक ठिकाणी खचत चाललेला आहे. २०११-१२ मध्ये ३० किलोमीटर रुंदीच्या या सिमेंट रस्त्याच्या खर्चासाठी मनपाने १०० कोटीची तरतूद केली. सुरुवातीला काम गतीने झाले. केडीके कॉलेज ते जगनाडे चौकापर्यंत काम पूर्ण झाले. मात्र, नंदनवन ते रेशीमबाग चौकच्या दरम्यान रस्त्याचे काम बंद पडले. मागील दोन वर्षांपासून हीच स्थिती आहे.
रेशीमबाग मैदानाच्या रस्त्यावर सिमेंट रोड तयार करणारी मशीन जागेवरच उभी असल्याचे आजही दिसून येते. अर्धवट रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत असून पावसाचे पाणी घरात शिरत आहे. एकीकडे अर्धवट रस्त्याने वाहन चालविणे कठीण झाले असताना दुसरीकडे मनपाची संबंधित कंत्राटदारावर मेहेरनजर कायम आहे.
१०० कोटी नव्हे, आता १३० कोटी
सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले तेव्हा ही योजना १०० कोटी रुपयांची होती. आता कंत्राटदार महागाई वाढल्याचे सांगत काम पूर्ण करण्यासाठी १३० कोटी रुपयांची मागणी करीत आहे. नियमानुसार दिलेल्या मुदतीत काम न झाल्यामुळे कंत्राटदारावर दंड ठोठावण्यात आला. परंतु दीड वर्षांपासून आर्बिट्रेटरची नियुक्ती करून सुनावणी सुरूच आहे. मनपा आता ११२ कोटी रुपये देण्याच्या तयारीत आहे. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर यांनी सांगितले, सिमेंट रस्त्याला घेऊन लवकरच बैठक बोलविण्यात येईल. यात सर्व समस्यांचा निपटारा करून कामाला सुरुवात केली जाईल.