चित्रपट महामंडळाच्या सभेत हाणामारी
By admin | Published: January 7, 2016 02:07 AM2016-01-07T02:07:57+5:302016-01-07T02:07:57+5:30
माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या हिशेबातील १३ लाख रुपये ताबडतोब भरावेत, अन्यथा कामकाज सुरू न करण्याचा निर्णय सभासदांनी
कोल्हापूर : माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमाच्या हिशेबातील १३ लाख रुपये ताबडतोब भरावेत, अन्यथा कामकाज सुरू न करण्याचा निर्णय सभासदांनी घेतल्याने अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची द्विवार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी गोंधळ तसेच मुंबईकर विरुद्ध कोल्हापूरकर सभासद यांच्यातील हाणामारीने पार पडली.
शाहू स्मारक भवन येथे दुपारी तीन वाजता सभेस सुरुवात झाली. यामध्ये ज्येष्ठ सभासद अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी तत्कालीन अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्या कारकिर्दीत १० कोटी रुपये महामंडळाला मंजूर झाल्याबाबत विचारणा केली. यावर प्रसाद सुर्वे यांनी हे दहा कोटी महामंडळाला
नव्हे तर, चित्रनगरीच्या फेन्सिंगसाठी मंजूर झाले होते आणि त्यापैकी ७ कोटी ५० लाख रुपये या कामासाठी खर्च झाले आहेत, असे उत्तर दिले. मात्र
याने कुलकर्णी यांचे समाधान झाले नाही.
यानंतर रणजित जाधव, दिग्दर्शक यशवंत भालकर आदी सभासदांनी सुर्वे यांनी ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमात महामंडळाचे ५० लाख रुपये खर्च करीत महामंडळाचे नुकसान केले. त्यापैकी १३ लाख रुपये स्वत: च्या खिशातून भरून देतो, असे सांगत मागील सभेत सभासदांसमोर आश्वासन दिले.
मात्र, हे आश्वासन अद्यापही पूर्ण न केल्याने आताच्या आता
सभागृहात १३ लाखांचा धनादेश आणि त्यावेळी लिहून दिलेला बॉण्डपेपर सादर करावा, अशी मागणी केली.
यावरून मुंबईतील सभासद आणि कोल्हापुरातील सभासदांमध्ये सुरवातीला बाचाबाची झाली. नंतर हा वाद वाढत गेला आणि दोन्ही बाजूच्या सभासदांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यावेळी बंदोबस्तासाठी बाहेर उभे असलेले पोलीस सभागृहात दाखल झाले. त्यांनी दोन्हीकडील सभासदांना आवरल्यानंतर पुन्हा सभा सुरू झाली. यावेळी अध्यक्ष विजय पाटकर यांनी सभेपुढील ८ विषयांपैकी ७ विषय आवाजी मताने मंजूर करून घेतले. त्यानंतर पुन्हा गोंधळाला सुरुवात झाली.
यावेळी पुन्हा रणजित जाधव, यशवंत भालकर आदी मंडळी आक्रमक झाली. यावेळी अध्यक्षांना तुम्हाला अशा पद्धतीने कारभार करता येणार नाही. १३ लाखांच्या वसुलीचे काय ते बोला असे सांगितले. तथापि, पाटकर यांनी गोंधळातच सभा संपल्याचे जाहीर केले.
(प्रतिनिधी)