पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने कारखानदाराला गंडा
By Admin | Published: January 30, 2017 03:25 PM2017-01-30T15:25:50+5:302017-01-30T15:37:58+5:30
पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने तसेच करणी दूर करण्याची बतावणी करीत एका भोंदूबाबाने कारखानदाराला तब्बल २९ लाख रुपयांना गंडवले आहे.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 30 - अक्षयकुंभ देऊन घरामध्ये पैशांचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने तसेच करणी दूर करण्याची बतावणी करीत एका भोंदूबाबाने कारखानदाराला तब्बल २९ लाख रुपयांना गंडवले आहे. पत्नी आणि आईचे दागिने विकून तसेच प्रसंगी ओळखीच्यांकडून उसणवारीने आणलेले हे पैसे उकळून भोंदूबाबा पसार झाला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जुलै २०१६ ते आजवर १७ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये घडला.
सागरनाथ मिठानाथ परमार, चंदूलाल सागरनाथ परमार (रा. वडगाव, जि. पालमपूर, गुजरात), जयपाल एस. परमार (रा. पालनपूर, गुजरात) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मंदार अरविंद वैद्य (वय ४७, रा. राधाकृष्ण बंगला, विठ्ठलनगर, सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्य यांचा शोभेचे फटाके बनविण्याचा व्यवसाय आहे. त्यांचा कारखाना सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे आहे. वैद्य हे धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमी साधू व बाबांचे येणे-जाणे असायचे. नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यावेळी आरोपी सागरनाथ परमार याने त्यांच्याकडे जाऊन शिधा नेला होता. त्यानंतरही त्याने पुन्हा जून २०१६ मध्ये त्यांच्याकडून भंडा-यासाठी अन्नधान्य नेले होते.
त्यावेळी त्याने तुम्हाला धंद्यात अडचणी आहेत, त्यावर उपाय सांगतो असे त्याने सांगितले होते. १० जुलै २०१६ रोजी पुन्हा भंडारा घ्यायला आला असता त्याने मी तुम्हाला अक्षय कुंभ देतो, त्याने सगळ्या अडचणी दूर होतील. तुमच्या १०० पिढ्यांना पुरेल इतके धन मिळेल, अशी बतावणी केली. त्यासाठी पाच रुपयांच्या हरणांची चित्रे असलेल्या दोन नोटा दाखवत स्मशानभूमीमध्ये विधी करावा लागेल, असे सांगत ९ हजार रुपये घेतले. अडथळे दूर झाल्याशिवाय अक्षयपात्रातून धन मिळणार नसल्याचे सांगत आणखी एका पूजेसाठी ४० हजार रुपये घेतले. हे पैसे चंदूलाल परमारच्या खात्यावर भरण्यात आले. त्यानंतर सागरनाथ याने वैद्य यांना घेऊन पुजा घातली. त्याने आणलेल्या मडक्यामधून कापड बांधून त्याने ५०,१०० रुपयांच्या नोटांचा पाऊस पाडला. या अक्षयकुंभातून जेव्हा पाहिजे तेव्हा पैशांचा पाऊस पाडू शकाल, असे सांगून त्याने तुमच्यावर करणी केल्याचे सांगत १२ भूतालीची पुजा करावी लागेल असे सांगितले.
आळंदी येथील स्मशानभूमीमध्ये पूजा घालण्यासाठी १२ लाख रुपये मागितले. पैसे न दिल्यास वचनात अडकला असून बारा भुतांचा कोप होईल, अशी भीती घातली. वैद्य यांनी तडजोड करून दीड लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा फोन करून बारा लाखच लागतील असे कळवले. वैद्य यांनी पत्नी व आईचे दागिने बँकेत गहाण ठेवून आठ लाख रुपये व मुदतठेवी मोडून चार लाख असे बारा लाख त्याला अंगडियामार्फत पाठवले. त्यानंतर त्याने पुन्हा आणखी पाच लाख मागितले. हे पैसेही अंगडियामार्फत गुजरातला पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांना सागरनाथ यांना रक्ताची उलटी झाल्याचे सांगत करणी तुमच्यावर उलटणार असल्याची भीती घातली. बाबांचा मृत्यू झाल्यास मृतदेह घरी आणून टाकण्याची भीती घातली. त्यामुळे वैद्य यांनी दहा लाख रुपये त्यांना जयपालच्या खात्यावर वर्ग केले. त्यानंतरही पूजा घालण्यासंदर्भात आरोपी त्यांना फोन करीत राहिला. वैद्य यांना फसवले गेल्याची जाणीव होताच त्यांनी आरोपीचे फोन घेणे बंद केले. त्याने पुन्हा १७ जानेवारी रोजी त्यांना फोन केला. त्यावेळी पैसे नसल्याने पुजा घालायची नसल्याचे त्यांनी सांगितले. समाजात प्रतिष्ठेला बाधा येईल म्हणून त्यांनी तक्रार द्यायचे टाळले होते. मात्र, शिक्रापूर पोलीस ठाण्यात अशाच स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली.