Maharashtra Political Crisis: सत्तास्थापनेसाठी फडणवीस सक्रिय; दिल्लीत गाठीभेटी, एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 07:27 AM2022-06-29T07:27:46+5:302022-06-29T07:29:30+5:30

गुवाहाटीतील अपक्ष लवकरच मुंबईत येणार, ठाकरेंच्या आवाहनाला शिंदे गटाचा विराेधच...!

Fadnavis active for power; Meetings in Delhi, talks with Eknath Shinde also | Maharashtra Political Crisis: सत्तास्थापनेसाठी फडणवीस सक्रिय; दिल्लीत गाठीभेटी, एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणी

Maharashtra Political Crisis: सत्तास्थापनेसाठी फडणवीस सक्रिय; दिल्लीत गाठीभेटी, एकनाथ शिंदे यांच्याशीही बोलणी

Next


नवी दिल्ली / मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात असतानाच पर्यायी सरकार देण्याच्या जोरदार हालचाली विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केल्या. दिल्लीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याबरोबरच त्यांनी बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशीही फोनवर यासंदर्भात चर्चा केली. 

२१ जूनपासून सुरू झालेल्या नाट्याची अखेर करण्यासाठी भाजप सरसावला आहे. सेनेच्या बंडखोर गटाने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावल्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्लीत हलला. कोर्टाने बंडखोरांना काहीसा दिलासा दिला असून, येत्या ११ जुलैपर्यंत पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत या १६ बंडखोरांवर कारवाई होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मंगळवारी फडणवीस यांनी दिल्लीत पाऊल टाकले. 
 
फडणवीस यांच्यासोबत ज्येष्ठ विधिज्ञ व भाजपचे खासदार महेश जेठमलानी होते. फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. यावेळी राज्यात सरकार स्थापनेबद्दलच्या रणनीतीबद्दल चर्चा झाली. सरकार स्थापनेचा दावा केव्हा  करायचा, यावरच चर्चा झाल्याचे समजते. २ व ३ जुलैला फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह  इतर नेते हैदराबादमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यग्र असतील. राज्यात गरज भासली तरच त्यामध्ये सक्रिय होतील. 

शिवसेना न्यायालयात -
राज्यपालांनी विश्वासमत सिद्ध करण्यास सांगितले तर शिवसेना त्याविरुद्ध सर्वोच्च  न्यायालयात धाव घेणार असून, त्यासाठीची सल्लामसलत शिवसेनेचे नेते आणि ज्येष्ठ विधिज्ञांदरम्यान झाली.

अस्थिरतेची चर्चा नाही-
मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीवर कुठलीही चर्चा झाली नाही, असे एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले. राज्यात ७ हजार २३१ पोलिसांची भरती करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. काही प्रलंबित विषयांवर मंत्रिमंडळाची बैठक उद्या होईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

समोर येऊन बोला, मार्ग काढू : उद्धव ठाकरेंचे आवाहन -
आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. काहींच्या कुटुंबातील सदस्यांनी संपर्क साधून आपल्या भावना मला कळविल्या. त्या भावनांचा शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. 

कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका, शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर एकत्र बसून मार्ग निघेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना केले. 

मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, आपण काही दिवसांपासून गुवाहाटीत अडकून पडला आहात. कुटुंबप्रमुख म्हणून सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाही, माझे आवाहन आहे, की आपण या, माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या व जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. आपण एकत्र बसून मार्ग काढू. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे, असे भावनिक आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

रेडा, कुत्रे म्हणता अन् समेटाची भाषा करता? शिंदेंनी फेटाळली ठाकरेंची ऑफर -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘परत या’ची ऑफर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावली आहे. 

एकीकडे आम्हाला तुमचे पुत्र अन् प्रवक्ते रेडा, कुत्रे म्हणतात आणि दुसरीकडे सरकार वाचविण्यासाठी आपण आमदारांना समेटाची हाक द्यायची याचा अर्थ काय, असा सवालही शिंदे यांनी केला आहे. 

ठाकरेंची ऑफर धुडकावून लावताना शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा. तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआ सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?
 

Web Title: Fadnavis active for power; Meetings in Delhi, talks with Eknath Shinde also

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.