फडणवीस ‘बोगस’, सदाभाऊ ‘भामटा’, तर पवार ‘अविश्वासू’ - राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:34 AM2019-02-11T00:34:16+5:302019-02-11T07:48:43+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.
कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘बोगस माणूस’,मंत्री सदाभाऊ खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी कोल्हापुरात केला.
स्वातंत्र्यानंतर देशात ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या गरिबी हटाओ व पाकिस्तानच्या मुद्यावर लढल्या गेल्या; पण २०१९ ची निवडणूक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढली जाणार आहे. ही ताकद शेतकरी नेत्यांच्या एकजुटीबरोबर चळवळीची असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापुरात रविवारी (10 फेब्रुवारी) एका खासगी कार्यक्रमात त्यांनी महाविद्यालयीन तरुणांसोबत दिलखुलास गप्पा मारल्या. त्यामध्ये ‘रॅपिड फायर’मध्ये ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? असे प्रश्न विचारण्यात आले, यावर फडणवीस ‘बोगस माणूस’, खोत ‘भामटा’, तर शरद पवार ‘अविश्वासू’ असल्याचे उत्तर त्यांनी दिले.
शरद जोशी यांचा महामानव असा उल्लेख करत शेट्टी यांनी चर्चेला सुरुवात केली. आंदोलन आणि दंगल यात फरक असून, दंगलीबद्दल तिरस्कार असतो. आंदोलनातून इतरांना त्रास होतो, हे जरी खरे असले, तरी शिवारातील वेदना घरापर्यंत पोहोचली तर स्फोट होण्यास वेळ लागत नाही. शेतकरी नेत्यांत जरूर मतभिन्नता आहे; पण ध्येय एकच आहे. त्यातूनच गेल्या दोन वर्षांत देशपातळीवर अनेक आंदोलने उभारली, त्या माध्यमातून काही मागण्या मान्यही करून घेतल्या. काँग्रेस की बहुजन विकास आघाडीसोबत जाणार हे ठरलेले नाही; पण माझी वैचारिक भूमिका ठरलेली आहे. राज्य घटनेला आव्हान देणाºयासोबत कदापि जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकारण गेले खड्ड्यात, शेतकºयांच्या घामाचे पैसे महत्त्वाचे आहेत. कोणाच्यात दम असेल, तर अशी उघड भूमिका घ्यावी, असे आव्हानही शेट्टी यांनी दिले.
शेट्टींना केलेले प्रश्न, कंसात उत्तरे
शेतकरी की लेखक (लेखक), दिल्ली की मुंबई (केव्हाही दिल्लीच), कोणाची भीती वाटते (भीतीच नाही), राग आला तर (डोळे मिटतो), मनाला लागलेला आरोप (जमिनी घेतल्याचा), काय करायला नको होते (महायुती).